▪️जखमीतील एका युवतीची प्रकृती गंभीर…
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
वेंगुर्ले – पेंडूर येथे दोन कुटुंबात जमीन जागेच्या कारणावरून वाद झाला. यात धारदार हत्यारांनी वार केल्यामुळे ६ जण जखमी झाले आहेत. यात एका युवतीच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याने ती गंभीर जखमी आहे.याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांच्या विरोधात परस्परांविरोधी जीवे मारहाण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमीना अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेंडूर येथील सुचित्रा गोपाळ कांबळी (२२) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार येथीलच आरोपी चंद्रकांत कांबळी, रमेश चंद्रकांत कांबळी, उमेश चंद्रकांत कांबळी, रिया रमेश कांबळी यांनी आपल्या शेतात काम करत असलेले फिर्यादीचे वडील गोपाळ कांबळी व काका आनंद कांबळी यांना दांड्याने मारहाण केली तसेच काकी शांती कांबळी हिला पाठीवर मारून दुखापत केली तर सुचित्रा व तिची आई लक्ष्मी या दोघी सोडवण्यास गेले असता यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोकीवर वार करून गंभीर दुखपत केली आहे. दरम्यान या गुन्ह्यात सर्व आरोपींवर भादवी कलम ३०७, ३२६, ३२३, ३४१, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी रमेश कांबळी उमेश यांना पोलिसांनी आज अटक केली असून उर्वरित रिया कांबळी व चंद्रकांत कांबळी याना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान येथीलच फिर्यादी रमेश चंद्रकांत कांबळी (४२) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गोपाळ धोंडू कांबळी, लक्ष्मी गोपाळ कांबळी, सुचित्रा गोपाळ कांबळी, राजश्री गोळाप कांबळी, आनंद धोंडू कांबळी यांनी फिर्यादी यांनी लावलेल्या भात शेतीचे नुकसान करत असताना विचारणा केली असता फिर्यादी याना शिवीगाळ करून फिर्यादी रमेश कांबळी यांना डोकीवर कुदळ मारून दुखापत केली तर त्यांचा भाऊ उमेश यांना दुखापत करून गळा आवळून खाली पडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात वरील आरोपींवर भादवी कलम ३०७, ३२४, ३४१, ३२३, ३५२,५०४, १४३, १४७, १४९ नुसार गुन्हा दाखक करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव व महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान करत आहेत.
