✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
एका युवतीची छेड काढण्याचा प्रकार नजीर नामक रिक्षाचालकाकडून सावंतवाडीत घडला आहे. दरम्यान या प्रकाराची विचारणा करण्यासाठी संबंधित युवती त्याच्या घरी गेली असता उलट संशयीतासह त्याच्या घरातील अन्य चार व्यक्तींकडून तिलाच मारहाण करण्यात आली. हा प्रकार आज सायंकाळच्या सुमारास घडला. याप्रकरणी संशयित नजीरसह अन्य चार व्यक्तींवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार आबा पिरणकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवती आपल्या भावाच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी दुचाकी घेऊन गेली होती. यावेळी अचानक खड्डा आल्यामुळे तिने आपली दुचाकी हळू केली. दरम्यान मागून रिक्षा घेऊन येणाऱ्या संशयित नजीरने आपली रिक्षा थांबवत “तेरे को मै घर छोडू क्या ?” अशी विचारणा केली. यावेळी तिने नकार दिल्यानंतर मनात लज्जा उत्पन्न होईल, असे इशारे केले. याच रागातून संबंधित युवती थेट संशयीताच्या घरी घडलेल्या प्रकाराची विचारणा करण्यासाठी गेली. यावेळी संशहितासह घरातील अन्य चार व्यक्तींनी तिला केस ओढत मारहाण केली. त्यानंतर घडलेला प्रकार तिने आपल्या भावाला सांगितल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित नजीर याच्यासह दोन पुरुष व दोन महिला अशा अन्य चार व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा सावंतवाडी पोलीसात दाखल करण्यात आला आहे.