✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी.
मेडल मिळवून देणारा, देशाचे नाव उज्ज्वल करणारा हा खेळाडू मी निर्माण केला आहे, असं अभिमानाने सांगता आलं पाहीजे. असे खेळाडू निर्माण करा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले तंत्र शिक्षण महाविद्यालयात 15 ते 22 जून क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याच्या समारोप प्रसंगी श्री. सातपुते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.
श्री. सातपुते पुढे म्हाणाले, आपल्या लहानपणी कडक शिस्तीचे, मायळू विशेष सहकार्य करणारे, उत्तम शिकवणाऱ्यां गुरुजींची नावे आजही आपण घेत असतो. आपली नावेही अशीच विद्यार्थी- खेळाडूंनी काढावीत, इतपत आपण उत्तम कार्य करावे. ज्यांना कुणाला खेळाडू होता आलं नाही, ती खंत सर्वोत्तम खेळाडू निर्माण करुन आपण भरुन काढावी. हा माझा खेळाडू आहे. त्याला मी मार्गदर्शन केले आहे. हे सांगताना उर भरुन आला पाहीजे. असे कार्य करावे, तरच या प्रशिक्षण शिबीराची फलनिष्पत्ती होईल.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार,व जोपासना करण्यासाठी पोषक असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून राज्याचे धोरण २०१२ घोषित करण्यात आले आहे. या क्रीडा धोरणानुसार खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती नवीन खेळ खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विदयार्थ्यांना योग्य कीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी अद्यावत कीडा धोरण सन २०१२ तयार करण्यात येऊन त्याच्या अंमलबजावणी करणेकरीता क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजन करण्यात आलेला आहे, अशी माहिती श्रीमती शिरस यांनी दिली. यावेळी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या क्रीडा शिक्षकांना प्रशस्ती पत्रे देण्यात आली. तालुका क्रीडा अधिकारी श्री. शिंदे यांनी सर्वाचे आभार मानले. सूत्रसंचालन रामचंद्र घावरे यांनी केले.
या शिबीराचे श्याम देशपांडे, यशवंतराव भोसले तंत्रशिक्षण महाविद्यालय या संस्थेचे अध्यक्ष व तज्ञ मार्गदर्शक रामचंद्र घावरे, पंकज राणे, जयश्री कसालकर, अजिंक्य पोफळे, अमित भाटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिबीरामध्ये योगा व प्राणायाम विषयावर चंद्रशेखर बांदेकर यांनी, आहार व पोषण विषयावर डॉ. श्रीम. कृपा गावडे यांनी, व्हॉलीबॉल विषयावर रुपेश गावडे यांनी, बास्केटबॉल विषयावर दिनेश चव्हाण यांनी , जलतरण तसेच क्रीडा प्रबोधिनी व शासनाच्या क्रीडा विषयक योजना विषयावर मनिषा पाटील यांनी, बॅडमिंटन विषयावर सुमुख चव्हाण यांनी, कांचन उपरकर यांनी रायफल शुटींग, योगेश फणसळकर यांनी कॅरम, श्रीम. तावडे यांनी योगा तर श्री ताराचंद पाटकर यांनी मैदानी या विषयावर मार्गदर्शन केले.
एकनाथ धनवटे यांनी तलवारबाजी, श्रीकृष्ण आडेलकर यानी बुध्दीबळ, दत्तात्रय मारकड यांनी क्रीडा पत्रकारिता, सुनील कांबळे यांनी फिट इंडिया, महेश जाधव यांनी दुखापत व प्रथमोपचार विषयावर, दिनेश जाधव यांनी कराटे, भालचंद्र कुलकर्णी यांनी तायक्वांदो, अतुल सावडावकर यांनी व्हॉलीबॉल विषयावर, रणवीर सावंत यांनी मल्लखांब, विष्णू कोरगावकर यानी टेबल-टेनिस, विद्या शिरस यांनी वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टींग या विषयावर, मास्टर ट्रेनर्स लिडअप्स गेम्स व मॉडिफायर्ड गेम्स या विषयावर मार्गदर्शन केले.
या शिबीरामधील मास्टर ट्रेनर्स रामचंद्र घावरे , पंकज राणे, जयश्री कसालकर, अजिंक्य पोफळे, अमित भाटकर, ॲलिस्का अल्मेडा यांनी देखील सदर शिबीरामध्ये योगा व प्राणायाम,ज्युदो, क्रीडा गतिमानता, खो-खो, कब्बड्डी, कुराश, शारीरिक शिक्षण व अध्यापन पध्दती, हॅण्डबॉल, आर्चरी, मॉडीफायर्ड गेम्स, लिडअप्स गेम्स या खेळांचे उत्तम असे मार्गदर्शन व प्रात्यक्षिके सादर केली.
