वेंगुर्ला /-
महाराष्ट्र राज्य माजी गृहराज्यमंत्री,सिंधुदुर्ग जिल्हा माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे ‘ स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी वेंगुर्लेवासिय – शिवसैनिक हे आमदार दीपक केसरकर यांच्या पूर्णपणे पाठीशी राहतील,असा विश्वास आज बुधवारी ३० सप्टेंबर रोजी वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक संदेश निकम यांनी व्यक्त केला आहे.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीतील नियोजित जागेतच होणार असल्याची आमदार दीपक केसरकर यांनी आज माध्यमाद्वारे माहिती दिली.याबाबत बोलताना संदेश निकम यांनी विधान केले आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले की,सावंतवाडी येथे प्रस्तावित असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीतच मध्यवर्ती ठिकाणी झाल्यास वेंगुर्ला – सावंतवाडी – दोडामार्ग भागातील जनतेला सोयीस्कर व फायद्याचे होणार आहे.दीपक केसरकर हे महाराष्ट्रातील चांगले नेते असून मातोश्रीवर त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या प्रस्तावित योजनांना निश्चितच न्याय देतील.खासदार विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक,जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे त्यांना चांगले सहकार्य लाभत आहे.गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी चांगली विकासकामे केली असून ७५ टक्के अनुदानावर चांदा ते बांदा ही योजना राबविली.परंतु प्रशासनाने योग्य जाहिरात न झाल्याने ती पूर्णपणे यशस्वी झाली नाही.तसेच त्यानी आपल्या कार्यकालात मच्छिमार,शेतकरी व अन्य घटकांसाठी विविध विकासात्मक योजना राबविल्या आहेत.
कोरोना कालावधीत ते मतदारसंघात नसले तरी आपल्या मतदारसंघातील विकासकामे,नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कायम संपर्कात असून यापुढेही त्यांचे कार्य असेच चालू राहील.दिपक केसरकर हे वेंगुर्ला- सावंतवाडी- दोडामार्ग या मतदारसंघाचे विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील असून आगामी तिन्ही नगरपरिषदेवरही शिवसेनेचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतील.सर्वच घटकांसाठी यापुढेही योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहतील,असा विश्वास संदेश निकम यांनी व्यक्त केला आहे.