✍🏼लोकसंवाद /- मुंबई.

महसूल विभागातील तब्बल साठहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास काढण्याचे काम राज्यातल्या या अतिगतिमान सरकारने केले आहे.यामध्ये प्रामुख्याने तहसीलदारांचा समावेश आहे. शासनाच्या विविध विभागांतील बदल्या दिवसाढवळ्या होतात, पण दिवसभर ‘महसूलवाढी’मध्ये व्यस्त असलेल्या महसूल विभागाने पहाटेच्या सुमारास बदल्यांच्या ऑर्डर जारी केल्या. मंत्रालयात झालेल्या या रात्रीच्या खेळाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे.

मंत्रालयातल्या सर्वच विभागांमधील बदल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. बदल्यांमध्ये पारदर्शक धोरण असल्याचे सांगण्यात येते. पण महलूस विभागाच्या बदल्या कधीही शासनाच्या वेबसाईटवर दिसत नाहीत. अत्यंत गूपचूप पद्धतीने बदल्या होतात.

एकच अधिकारी आठ वर्षे पदावर

महसूल विभागातील सहसचिव पदावरील एक अधिकारी आठ वर्षे एकाच पदावर ठिय्या ठोकून आहे. विभागीय चौकशीपासून क्लीन चिट आणि बढती व पोस्टिंगचे काम एकाच अधिकाऱ्याकडे आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्व अधिकाऱ्यांच्या तीन वर्षांनंतर बदल्या होतात, पण ‘महसूल वाढी’मुळे या सहसचिवांना दरवर्षी मुदतवाढ मिळत असल्याची रंगतदार चर्चा मंत्रालयात सध्या आहे.

पाच लाखांपासून 25 कोटी

महसूल विभागातील डेप्युटी कलेक्टर, ऑडिशनल कलेक्टर, तहसीलदार या क्रीम पदांच्या बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी तर मध्यंतरी शासकीय बदल्यांमधील बदल्यांचे रेटकार्डच जाहीर केले होते. पाच लाख रुपयांपासून पंचवीस कोटी रुपये दर असल्याचा आरोप करीत राजू शेट्टी यांनी सरकारला पत्र पाठवले होते.

पहाटे तीन-साडेतीन व चार वाजेपर्यंत या अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर बदल्यांच्या ऑर्डर धडकल्या. इतर खात्यांच्या बदल्या दिवसाढवळ्या होतात. पण महसूल खात्याच्या बदल्यांचे आदेश मध्यरात्री निघाले. त्यामुळे रात्रीस झालेल्या बदल्यांच्या या खेळामध्ये संशय व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page