▪️कामगारांच्या प्रलंबित लाभांबाबत संघटना पदाधिकारी आक्रमक…

✍🏼लोकसंवाद /- ओरोस.

सहाय्यक कामगार आयुक्तांकडून येत्या तीन महिन्यांत सर्व प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावून देण्याची ग्वाही

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदीत कामगारांना विविध समस्यांबाबत व कामगार सुविधा केंद्राच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी यांनी त्याची तात्काळ दखल घेत बैठकीचे नियोजन केले होते. त्यानुसार 31 मे रोजी दुपारी 3 वाजता सरकारी कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनेशी संबंधित पदाधिकाऱ्यांशी सहाय्यक कामगार आयुक्त श्री आयरे यांनी सविस्तर चर्चा करीत कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. चर्चेच्या सुरुवातीलाच प्रसाद गावडे यांनी आक्रमक पवित्रा घेत नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेतील कार्यालयीन उदासीनता,प्रलंबित लाभाचे प्रस्ताव व लाभ प्रस्तावांची चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कार्यपध्दतीबाबत मुद्देसूद प्रश्नांची सरबत्ती केली.तर मध्यान्ह भोजन योजनेच्या वितरणातील त्रुटींबाबत पुरवठादार कंपनीच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. तर बाबल नांदोसकर यांनी कामगार अधिकारी नसल्याने होणाऱ्या गैरसोयीचे पाढे वाचले. अशोक बावलेकर यांनी मृत कामगारांच्या वारसांच्या प्रलंबित प्रस्तावांबाबात विचारणा केली. श्री आयरे यांनी वरील सर्व समस्या येत्या तीन महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासन देत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. तर भोजन वितरण करणाऱ्या पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कामगारांना लाभ देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यावेळी स्वाभिमानी कामगार संघटनेचे प्रसाद गावडे,सतीश कदम,संतोष बाईत,आपा मांजरेकर,आनंद चव्हाण, बांधकाम कामगार कल्याणकारी संघटनेचे बाबल नांदोसकर,अनिल कदम,साळकर,दिपक गावडे,एकनाथ सावंत स्वयंप्रेरित संघटनेचे झारापकर, अशोक बोवलेकर, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे प्रकाश दळवी, कोकण श्रमिक संघटनेचे संतोष तेली, नारिंगरेकर,दुकाने निरीक्षक श्री हुंबे यासंह अनेक कामगार उपस्थित होते.जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सिंधुदुर्गातील बांधकाम कामगार संघटना व पदाधिकारी एकवटल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page