✍🏼लोकसंवाद /- कोल्हापूर.
वैजापुर : संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या नृत्यांगणा गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोठी गर्दी करतात. सध्या गावोगावी गौतमीचे कार्यक्रम होत असून याच कार्यक्रमात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गौतमीच्या कार्यक्रमात पत्र्याचे छत कोसळून 10 जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महालगावात 8 मे रोजी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी गौतमी पाटील एका कापड दुकानाच्या उद्घाटनासाठी आली होती. यावेळी गौतमी पाटीलला पाहण्यासाठी साऱ्या गावानेच मोठी गर्दी केली होती. यावेळी गौतमीचा डान्स पाहण्यासाठी काही तरुण दुकानाच्या पत्र्यावर चढले होते. पण याच वेळी जास्त वजन झाल्यामुळे हे पत्र्याचे छत कोसळले.
पत्र्याचे छत कोसळताच त्यावर उभे राहिलेले 10 ते 15 तरुण छतासोबत खाली कोसळले. या घटनेत 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पण कोणाला गंभीर दुखापत झाली नसल्याचे देखील सांगितले जात आहे. या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. छत कोसळल्याची घटना घडल्यानंतर गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम तात्काळ थांबवण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.