✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा जेथे होता, त्या ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरण महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीवर अवलंबून न राहता स्वतः स्वखर्चातून करण्याचा निर्णय नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतला व त्याची प्रत्यक्षात कार्यवाही देखील आज केली.

गेले पाच महिने सातत्याने महामार्ग प्राधिकरण ला सूचना देऊन देखील कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा काढलेल्या जागेच्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण केले जात नव्हते. मात्र याबाबत वारंवार सूचना देऊनही दखल घेतली नसताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या कामाकरिता स्वतः पुढाकार घेतला आहे. डांबरीकरण कामावेळी नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी ही अक्षरशा गेंड्याच्या कातडीची असल्याचा आरोप केला.

जुना पुतळा काढल्यानंतर त्या ठिकाणचा काही भाग हा खोदलेल्या स्थितीत होता. त्यामुळे येथे अनेकदा अपघात घडत होते. याबाबत महामार्ग प्राधिकरण ला सूचना देखील दिल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून निव्वळ या कामावर डोळेझाक केली गेली. अखेरीस नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी स्वतःच या कामाकरता पुढाकार घेत या ठिकाणचे डांबरीकरण चे काम हाती घेतले. जेणेकरून या ठिकाणी अपघात घडू नयेत व पुतळा स्थलांतरण केल्यानंतर या ठिकाणचा रस्ता वाहतूकीस देखील सुरळीत व्हावा या दृष्टीने हे काम मार्गी लावून घेतले.

नगराध्यक्षांच्या या तत्परतेबद्दल शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पेट्रोल पंपापर्यंत सर्विस रस्त्यालगची स्ट्रीट लाईट देखील वारंवार सांगून अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.तसेच ते सर्विस रोड, ब्रिज खालील जागा नगरपंचायत जवळ वर्ग करा ही मागणी केली.ते देखील हायवे प्राधिकरण करत नाही असे सांगत नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी नाराजी व्यक्त केली. तर छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद पारकर यांनी गेली महिने हे काम प्रलंबित असताना नगराध्यक्षांनी सर्विस रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम पाठपुरावा करत मार्गी लावून घेतले त्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अभिजीत मुसळे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद पारकर, मंडळाचे पदाधिकारी आनंद पारकर, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी सभापती बाळा जठार, निखिल आचरेकर, पंकज पेडणेकर, नवराज झेमणे, इब्राहिम शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page