✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
वैश्य समाजातील मुलांना नोकर्या मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी संबधित गरजू मुलांची यादी माझ्याकडे द्या. त्यांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अभिवचन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान सावंतवाडी वैश्य समाजाच्यावतीने उभारण्यात येणार्या वसतिगृहाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे. पहिल्या टप्प्यात दहा खोल्यांचे बांधकाम सुरू करावे. त्यासाठी लागणार्या देणग्या मी उपलब्ध करून देईन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सावंतवाडी वैश्य समाज आणि जिल्हा वैश्यवाणी समाज यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे, बाळ बोर्डेकर, वैश्य समाज अध्यक्ष रमेश बोद्रे, दिलीप नार्वेकर, पुष्पलता कोरगावकर, साक्षी वंजारी, कल्पना बांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले , मी आमदार आणि मंत्री होण्यास माझ्या समाजाचा मोठा वाटा आहे. एरव्ही मला सर्वच समाजातील लोकांनी मदत केली आहे. परंतू या ठिकाणी माझ्या समाजाने माझ्या पाठिशी ठाम राहण्याचे काम केले. त्यामुळे माझ्यासह अन्य कित्येक जण या ठिकाणी राजकारणात यशस्वी होवू शकले ही वस्तूस्थिती आहे. ते पुढे म्हणालेे, या ठिकाणी समाज सक्षम झाला पाहिजे त्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न आहे. समाजातील बांधवानी सुध्दा एकत्र येणे गरजेचे आहे आणि एकत्र आल्यास कोणतीही शक्ती आपल्याला मागे खेचू शकत नाही. ही वस्तूस्थिती आहे, असे सांगून त्यांनी जिल्ह्यातील वैश्य समाजाच्या महिलांना आपण लवकरच ट्रिप साठी पाठविणार आहोत. त्यासाठी लागणारा खर्च आपण देवू, असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर शंभर वर्षे पुर्ण झाल्या बद्दल सर्व समाज बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.