आचरा /-
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे.कापलेले भात वाळवायचे कुठे त्यामुळे ज्यांच्याकडे मनुष्य बळ जास्त आहे ते तातडीने भात झोडणीचे कामही उरकून घेत आहेत.एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असताना दुसरीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढल्याने शेतकरी राजा पुरता मेटाकुटीस आला आहे.
सतत कोसळणाऱा पावसामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.आचरा परीसरात खाडी लगतची, मळे शेतीत पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने भातशेती कुजू लागली आहे.बहुवंशी भागात भाताला कोंब आले आहेत.सध्या सुरू असलेल्या उन पावसाच्या खेळात कापणी केलेले भात वाळवायचे कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.अशातच शेतकरयांनी कापणी सुरू केली आहे.ज्यांच्याकडे मनुष्य बळ जास्त आहे ते शेतकरी तातडीने भात झोडणी करुन मिळेल ते भात गोळा करत आहेत.
*वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढला*
अती कोसळणाऱ्या पावसाने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचाही उपद्रव वाढला आहे.माकड,डुकरांसह इतर वन्य प्राण्यांकडूनही भुईमूग शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात आहे.त्यामुळे निसर्गाच्या लहरी पणासोबत वन्य प्राण्यांचाही त्रास वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे.