लोकसंवाद /- कुडाळ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेलगत असलेल्या बांदा गावास प्राचीन आणि समृद्ध इतिहास लाभलेला आहे.ज्यावेळी सावंतवाडी हे नावही अस्तित्वात नव्हतं, त्या काळी ‘बांदे’ (बांदा) हे नावाजलेलं शहर म्हणून ओळखलं जायचं. १२ व्या शतकाच्या आसपास आदिलशाहीत बांद्याला सुभ्याचं महत्त्व होतं.युसूफ आदिलशहाने ‘बांदे’ गावचं नाव बदलून ‘अदिलाबाद’ केलं.यापूर्वीही या गावाचं नाव ‘बांदे’ होतं.देवगिरीच्या दरबारात सापडलेल्या मोडी कागदपत्रांमध्ये या गावाचा ‘बांदे’ असाच उल्लेख आहे.परंतु, संस्थानकाळानंतर या गावाला बांदा म्हणून ओळखलं जाऊ लागलं.बांदा भागाला आदिलशाही ‘तळकोकण – सुभा’ किंवा ‘दिवाण साहेबी’ असं म्हटलं जायचं.बांदा येथील कोटात बिजापूरच्या आदिलशाह बादशहाचा वजीर राहत असे.
आदिलशाही काळातील बांदा याठिकाणी आजही ऐतिहासिक प्राचीन वास्तू मोठय़ा दिमाखाने उभ्या आहेत.आदिलशाही काळात बांदा नगराचा प्रत्येक रस्ता सुमारे ३५ फूट रुंद होता. त्याकाळी या अदिलाबादमध्ये एक लाख लोकवस्ती होती. आदिलशहाने बांधलेले घुमट, मशिदी आणि विहिरींचे अवशेष आजही बांद्यात पहावयास मिळतात.
आदिलशाही काळात बांदा गावात बांधलेल्या मशिदी आणि घुमट आजही अस्तित्वात आहे. या घुमटांचं बांधकाम म्हणजे अप्रतिम शिल्पकलेचा नमुना आहे. गोवा सीमेलगतच्या पत्रादेवी मार्गावर आमराईच्या पुढे टेकडीवर जो घुमट आहे तो ‘बैलघुमट’ म्हणून ओळखला जातो. या घुमटाची थोडी पडझड झालेली आहे. या घुमटाला आदिलशाही काळात ‘रोजे घुमट’ असं नाव होतं. ‘रोजे’ याचा अर्थ समाधी असा सांगितला जातो. तो आजही ‘रोजेघुमट’ म्हणून ओळखला जातो. तथापि आदिलशाहीत त्यास ‘यादगारी – खिजर’ असं नाव होतं. हा घुमट अद्यापही सुस्थितीत आहे. हे घुमट सोळाव्या शतकाच्या मध्यात बांधण्यात आले. बैलघुमट आदिलशहाचा पहिला सुभेदार पिरखान याने बांधला. राहिलेलं काम पाचव्या सुभेदाराने केलं. ‘यादगारी – खिजर’ च्या ‘बैलघुमटा’च्या उत्तर आणि पश्चिम दिशेला जी शेतजमीन आहे.
सध्या या वास्तुकडे दुर्लक्ष झाल्यामुळे घुमटावर अनेक झाडे आलेली आहेत.चाहुकडेने झुडपांनी वेढलेला आहे. ठिकठिकाणी प्लॅस्टिक बॉटल्स, दारूच्या बॉटल्स पडलेल्या आहेत. घुमटाच्या आतमध्ये वर वटवाघळे तर खाली वाटवाघळानी टाकलेल्या विष्टेच्या दुर्गंधीमुळे घुमटामध्ये जाणे शक्य नाही. ही ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी आपल्याकडे आर्त हाक मारत आहे.
रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठीकण विभाग व बांदा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथील या रोजे घुमट वास्तूच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले असून आपला रविवारच्या सुट्टीचा २/३ तसंच बहुमूल्य वेळ या मोहिमेसाठी आपण द्यावा असे आवाहन दुर्ग मावळा परिवारातर्फे करण्यात येत आहे.सदर मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर WhatsApp संदेश अथवा संपर्क साधावा अशी विनंती दुर्ग मावळा परिवाराकडून करण्यात आली आहे.संपर्क.९८६०२५२८२५ / ९४२२२६३८०२.