लोकसंवाद /- सावंतवाडी.
मडुऱ्यात मगरींची दहशत कायम असल्याचे वास्तव्य पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.डिगवाडी येथील शेतकरी बागायतदार भूषण प्रभू हे आपल्या बागायती जात असताना अचानक त्यांना पाण्याचा आवाज आला. हुशारीने त्यांनी पाहिले असता सहा ते आठ फुटी मगर त्यांच्या निदर्शना झाली. त्यांनी तेथून आपला जीव वाचवला परंतु आपल्या पाळीव प्राण्यांना भविष्यात अशा महाकाय मगरींपासून धोका असल्याने वनविभागाने तात्काळ मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी मडुरा येथील सर्व शेतकरी बागायतदार तसेच नागरिकांनी केली आहे.
मगरीच्या हल्ल्यात पाळीव जनावरे व मनुष्यहानी अनेकदा झाली. परंतु वनविभागाकडे मगरींच्या बंदोबस्तासाठी ठोस अशा उपायोजना नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास डिगवडी येथील शेतकरी भूषण प्रभू हे आपल्या बागायती जात होते. बागायती जवळ असलेल्या ओहळात सहा ते आठ फुटी मगर त्यांच्या निदर्शनास आली. ओहोळाजवळ नेहमी त्यांची पाळीव जनावरे तसेच मिरची, चवळी अशी रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार ये जा करावी लागते. यापूर्वी मगरींच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले तशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वनविभागाने आताच तात्काळ अशा धोकादायक मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी भूषण प्रभू तसेच संपूर्ण गावातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.