मालवण/-

कोरोना महामारी काळात जिल्हा रुग्णालयाचा कारभार अतिशय गलथान पद्धतीने सुरू असून रुग्णांच्या जीविताशी खेळ चालू आहे. पालकमंत्री, सत्ताधारी आमदार यांचा या कारभारावर काडीचा अंकुश नाही. कोरोना रुग्णांचे बळी जात राहिले तर जनतेचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही, जनतेच्या या उद्रेकाचे नेतृत्व आम्ही करु, असा इशारा मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी दिला आहे.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्य चिकित्सक, पालकमंत्री, आमदार ,खासदार यांचा कुणाचा कुणाला मेळ नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडत असतील तर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक भूमिकाही पाताडे, परुळेकर यांनी मांडली.

मालवण पंचायत समितीची ऑनलाईन सभा सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, गटनेते सुनील घाडीगांवकर, विनोद आळवे, कमलाकर गावडे, अशोक बागवे, सोनाली कोदे, सागरिका लाड, गायत्री ठाकूर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर आदी सदस्य उपस्थित होते. अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी दिली.
कोविडसाठी शासन पैसे देते मग ते पैसे जातात कुठे ? रुग्णालयात व्हेंटिलेटर लावायला कोणी नाही. पेशंटच्या संपर्कातील नातेवाईक रुग्णालय आवारात बिनधास्त फिरत असतात. यामुळे इतर आजाराच्या पेशंटना इथे येऊन संसर्ग होतो. कुठल्याही प्रकारची सुविधा नाही मात्र उद्धट उत्तरे देण्याचे काम रुग्णालयाकडून केले जाते. सुदन बांदिवडेकर यांच्या मृत्यूस देखील हेच कारणीभूत आहे. असाही आरोप पाताडे, परुळेकर यांनी केला.

कोरोना पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून औषध आणायला सांगितली जातात. मग पालकमंत्री, आमदार सांगतात तो औषध पुरवठा कुठे गेला ? काही वेळा रुग्णवाहिकाही मिळत नाही, अशी स्थिती आहे. टेस्टिंग रिपोर्ट वेळेत मिळत नाहीत. मग पूर्वी मिरज वरून मिळणारे रिपोर्ट ५ ते ७ दिवसात मिळत होते ते बरे होते. त्यामुळे जनतेचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. किंबहुना त्याचे नेतृत्व आम्ही करु. असा इशारा पाताडे, परुळेकर यांनी दिला आहे.

उमेद अंतर्गत जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यामुळे बचत गटांचे कामकाज खूप समाधानकारक सुरू आहे. परंतु ज्यांचा कंत्राटी कार्यकाळ संपला आहे अशांना काढून टाकण्याचा घाट राज्यशासन घालत आहे. तरी या सर्व कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी. तसेच लॉकडाऊन काळात रोजगार ठप्प असल्याने बचत गटांच्या कर्जाचे व्याज माफ व्हावे, अशी भूमिका सभापती अजिंक्य पाताडे यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page