✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.
भाजपा दिव्यांग विकास आघाडी – सिंधुदुर्ग च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आम. बच्चु कडु यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करणार असल्याचे घोषित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच शिंदे – फडणवीस सरकार हे दिव्यांगांच्या भावनांचा आदर करणारे सरकार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले. दिव्यांगाप्रती शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी व आभार व्यक्त करण्यासाठी भाजपा दिव्यांग विकास आघाडीची जिल्हा पदाधिकारी बैठक कसाल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शिंदे- फडणवीस सरकारने गाव- खेड्यातील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग भवन तथा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी असुन, ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती इतकी देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अकोला व ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच खासगी क्षेत्रामध्ये दिव्यांगांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी सरकारने समीती नियुक्त केल्याचे सांगितले. यावेळी दिव्यांग आघाडीचे जिल्हा सरचिटणीस शामसुंदर लोट, स्वाती राऊळ, दिक्षा तेली, चव्हाण मॅडम, सुनील तांबे, प्रकाश वाघ, प्रकाश सावंत, प्रशांत कदम, विठ्ठल शिंगाडे, निलम राणे, मठकर इत्यादी उपस्थित होते.
