सिंधुदुर्गनगरी /-

सध्या जिल्ह्यात कोविडचे प्रमाण वाढत आहे. आशावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रशासनासोबत काम करावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम ॲपच्या माध्यमातून आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, लोकांना सध्या मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. राजकीय भूमिका बाजूला ठेऊन एकत्र यावे. कोरोना पासून सर्व जिल्हावासियांचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी प्रशासनासोबत सहकार्याने काम करणे ही आजची गरज आहे. आरोप – प्रत्यारोप होतच राहतील पण त्याच वेळी जिल्ह्यावासियांच्या आरोग्याची काळजीही आपणा सर्वांना घ्यावयाची आहे असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले.
कोविडच्या वॉर्डमध्ये रुग्णांचे नातेवाईक जाणार नाही याची जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना करून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, कोविडच्या रुग्णांना रुग्णालयामध्ये दर्जेदार जेवण मिळालेच पाहिजे. त्यासोबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही चांगल्या दर्जाचे जेवण पुरवले गेले पाहिजे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्वतः लक्ष घालून कार्यवाही करावी. कोविड व्यतिरिक्त इतर आजारांवरील औषधांचाही पुरसा साठा जिल्ह्यात उपलब्ध करुन ठेवावा. नॉन कोविडच्या रुग्णांनाही चांगली सेवा द्यावी. कोविड केअर सेंटरमध्ये तातडीने स्टीमर उपलब्ध करून द्यावेत. खाजगी रुग्णालयांना लोन बेसिसवर रेमडिसिव्हरची इंजेक्शन्स उपलब्ध करुन द्यावीत, जेणे करून रुग्णांचे प्राण वाचवता येतील. आपला उद्देश, रुग्णांचे प्राण वाचवणे हा आहे. त्यामध्ये प्रशासनाने कोणतीही कसूर करू नये. खाजगी डॉक्टर्सची सेवा सध्या अधिग्रहित केली आहे. त्याच प्रमाणे वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठीही कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी अधिकारी वर्गाला दिल्या.
लोकप्रतिनिधी म्हणून कोरोना विषयीचे काही उपाय व सूचना असल्यास लोकप्रतिनिधींनी त्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी यांना द्याव्यात. सर्वांनी समन्वयाने काम केल्यास जिल्हा वासियांना चांगल्या सुविधा देता येतील असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी मी सध्या जोरदार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात नवीन रुग्णवाहिका लवकरच दाखल होत आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथए 58 जंम्बो सिलेंडर्स भरता येतील इतक्या क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट येत्या आठवड्यात कार्यान्वित करण्यात येत आहे. पद भरती करण्यात येत आहे. या सर्व कामामध्ये जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केले.
या चर्चेमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य सहभागी झाले होते. चर्चेमध्ये प्रदीप नारकर, अंकुश जाधव, प्रितेश राऊळ, नागेंद्र परब, संजय पडते, संजना सावंत, राजेंद्र म्हापसेकर, रोहिनी गावडे, शारदा कांबळे, नितीन शिरोडकर, संपदा देसाई यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच या चर्चेमध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदी सहभागी झाले होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page