मुंबई /–
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात “हर घर तिरंगा’ हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, या कालावधीत राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी निगडीत यंत्रणांद्वारे “घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
दिनांक 13 ते 15 ऑगस्टदरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, सर्व संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत घरोघरी दररोज संध्याकाळी झेंडा उतरविण्याची गरज नाही. तथापि, कार्यालयांना यासंबंधी ध्वजसंहिता पाळावी लागेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.