कुडाळ /-

आजच्या युगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू मानत केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० राबविण्याचे ठरविले आहे. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम करता यावेत तसेच त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत व्हाव्यात या हेतूने गणित विभाग, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि गणित विभाग, कला, वाणिज्य, आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा यांत सामंजस्य करार करण्यात आला. सदर करारात विविध उपक्रमांसाठी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे आदान प्रदान होणार असून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होणार आहेत. याच अंतर्गत कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील गणित मंडळातर्फे “वैदिक गणितातील अंतर्दृष्टी” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कला, वाणिज्य, आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा येथील संशोधक व प्राध्यापक डॉ. रंजन खातू यांनी या विषयावर विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी वैदिक गणितातील महत्वपूर्ण क्लृप्त्या विशद केल्या. सध्याच्या युगात स्पर्धा परीक्षांचे वाढते महत्व व सदर परीक्षांना सामोरे जात असताना गणिताची वाटणारी भीती यातून सोपे व जलद मार्ग कसे काढता येतील या उद्देशाने हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाचे ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभागातील डॉ. नागेश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. बी. झोडगे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना सद्ययुगातील गणिताचे महत्व पटवून देत असतानाच अपेक्षित ध्येयपूर्तीसाठी मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या व्याख्यानास एकूण ५७ विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम गणित मंडळाचे अध्यक्ष तथा गणित विभागप्रमुख डॉ. एस. के. पवार यांच्या संकल्पेतून साकार झाला तसेच कार्यक्रमास प्रा. आर. बी देशमुख, प्रा. श्रीपाद प्रभू आदी प्राध्यापक उपस्थित होते. क. म. शि. प्र मंडळाचे अध्यक्ष मा. भाईसाहेब तळेकर तसेच सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page