कणकवली /-

दहावी निकालात गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिल्ह्याची शान राखली आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधी येथील जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या फायद्यासाठी प्रयत्न करत आहेत. ओसरगाव टोल विरोधात सर्वपक्षीयांनी आवाज उठवला आणि टोलवसुली स्थगित झाली. या विरोधाला सातत्य असणे गरजेचे आहे. मात्र अंतर्गत पाठिंबा देऊन,टोलवसुली सुरू करण्याचे काम काही पक्षाचे लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टोलवसुली मधून मुभा मिळणार नसल्याचे संकेत दिले. आमदार नितेश राणे यांनी जनता खड्ड्यात गेली तरी चालेल. टोलवसुली बाबत ठेकेदाराकडून स्वतःला कंत्राट मिळण्यासाठी बोलणी केल्याचा दावा उपरकर यांनी केला. तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनीही मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये टोल ठेकेदार कंपनीशी वाटाघाटी करून स्वतःला टोलवसुलीचा पोट ठेका मिळण्यासाठी बोलणी केल्याचाही दावा उपरकर यांनी केला. उद्या आमदार नितेश राणे आणि खासदार विनायक राऊत यांनी टोलवसुलीचा ठेका मिळवल्यास आश्चर्य वाटू नये. काहीही झाले तरी MH 07 पासिंगच्या गाड्यांना टोलमुक्ती मिळायलाच हवी, ही मनसेची भूमिका असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले. टोलवसुली बाबतची निविदा चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. 63.475 किलोमीटर अंतरासाठी निविदा काढण्यात आल्या. यासाठी 8 लाख 42 हजार रक्कम ठेकेदाराने भरणा केली होती. एखाद्या टेंडरमध्ये किलोमीटर चुकले असतील, कमी किलोमीटर दाखविण्यात आले असतील तर फेरनिविदा निघणे गरजेचे होते. मात्र फेरणीविदा न काढता ठेका देण्यात आल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. लहान वाहनांना 90 रु. टोल निविदेत दाखविण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात 115 रु. वसुल केले जाणार होते. हे दर प्रशासनाकडून जनतेला कमी न करता ठेकेदाराला कमी करून देण्यात आले आहेत. जमीन मालकांना जमिनीची 5 पट रक्कम दिलेली पुढील 70 ते 80 वर्षांत जनतेच्या खिशांतूनच वसूल केली जाणार आहे. जोवर हायवे चौपदरीकरण 100 टक्के पूर्ण होत नाही, भूसंपादनाचा संपूर्ण मोबदला जमीनमालकांना दिला जात नाही, टोलनाक्यावर वाहनचालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोवर ओसरगाव टोलनाक्यावर टोलवसुली करण्यास मनसेचा विरोध राहील, या मनसेच्या भूमिकेचा उपरकर यांनी पुनरुच्चार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page