सुमारे २७ गावातील गोरगरीब रुग्ण सुखावतील ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना निवेदन सादर

कुडाळ /-जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे शासकीय निकषानुसार सर्व सोई सुविधा व तज्ञ डॉक्टर उपलब्धतेसह ग्रामिण रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, यामुळे पंचक्रोशीतील सुमारे १६ ग्रामपंचायत हद्दीतील २७ गावातील गोरगरीब-गरजू रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना राष्ट्रीय भोई समाज क्रांतीदलाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा भोई यांनी दिले.

श्री. रामचंद्र भोई निवेदनात म्हणतात की, राज्यात आरोग्य सेवा संचालनालयामार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभाग रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, तसेच सामान्य रुग्णालयामार्फत पुरविण्यात येतात. त्यानुसार जिल्ह्यातील माणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत माणगांव पंचक्रोशितील २७ गावातील गरीब व गरजु रुग्णांना वेळोवळी प्राथमिक स्तरावरील सेवा कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमार्फत प्रामाणिकपणे नियमीत मोफत मिळत आहे. मात्र गेली दोन वर्षे सर्वत्र सुरु असलेल्या कोरोना सदृश परीस्थीतीमुळे ग्रामीण भागातील बरीच कुटुंबे रोजगाराअभावी उध्वस्त झालेली आहेत. अशा परीस्थीतीत अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारावर माफक दरात औषध पुरवठ्यासह योग्य ते उपचार वेळीच न मिळाल्यामुळे काही घरातील कर्तापुरुष/ कुटुंबाचा आधार गमावल्याने बऱ्याच कुटुंबाची आर्थिक परीस्थीती हलाखीची झालेली आहे.

कोरोना सदृश्य तसेच अन्य कारणामुळे कित्येक कुटुंबाची कोलमडलेली आर्थिक स्थिती, त्यात उद्भवणाऱ्या गंभीर आजारावर तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रावर योग्य तसेच वेळीच उपचार होवू न शकल्यामुळे काही कुटुंबानी गमावलेले जीव, विचारात घेता माणगांव, आकेरी, नानेली, तुळसुली, साळगांव, कालेली, वाडोस, महादेवाचे केरवडे, कर्याद नारुर, वसोली, शिवापूर, पुळास, हळदीचे नेरुर, गोठोस, निवजे या ग्रामपंचायत हद्दीतील रुग्णांच्या सोईसाठी माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे शासकीय निकषानुसार आवश्यक सोई सुविधा व तज्ञ डॉक्टर उपलब्धतेसह ग्रामिण रुग्णालयात रुपांतर होणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या माणगांव पंचक्रोशितील गरीब रुग्णांना आपल्या भावातच दुय्यम आरोग्य सेवा उपलब्ध होवू शकते. यासाठी माणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ शल्यचिकीत्सक, शस्त्रक्रिया करणारे तसेच भुल देणारे डॉक्टर, औषध व साधन सामुग्री तसेच शासकीय निकषानुसार खालील सुविधासह, ग्रामीण रुग्णालयात रुपांतर होणे गरजेचे आहे.

ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक सोई सुविधा.
१) बाहयरुग्ण विभाग, २) आंतरुग्ण विभाग, ३) माता बाल संगोपन विभाग, ४) तात्काळ उपचार कक्ष, ५) प्रयोग शाळा, ६) प्रसुतीगृह, ७) शवविच्छेदन विभाग, ९) नवजात अर्भक काळजी कोपरा १०) क्ष-किरण, ११) न्याय वैद्यकीय उपकरणे, १२) शस्त्रक्रिया गृह, १३) नेत्र तपासणी, ८) वाहन सुविधा (रुग्णवाहीका), १४) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, १५) छोटया-मोठ्या शस्त्रक्रिया, १६) रक्त पुरवठा विभाग, १७) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातंर्गत आरोग्य सुविधा

तरी आपल्या माणगांव पंचक्रोशितील गरीब व गरजु रुग्णाना आपल्या गावातच तात्काळ माफक दरात औषध पुरवठ्यासह, दुय्यम आरोग्य सेवा उपलब्ध होणेसाठी शासकीय निकषानुसार आवश्यक सोई सुविधा व तज्ञ डॉक्टर उपलब्धतेसह माणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर होणेसाठी कृपया आपले स्तरावरुन योग्य ती कार्यवाही सत्वर होणेस विनंती आहे, असे श्री. भोई यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page