You are currently viewing वेंगुर्ले नगरपरिषद कंत्राटी कामगार प्रश्नी भाजपा शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

वेंगुर्ले नगरपरिषद कंत्राटी कामगार प्रश्नी भाजपा शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

सिंधुदुर्ग /-

वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेतील ६० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व कामगार आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. शहरातील कचरा उचलला जात नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत भाजपाने आवाज उठवला असून त्या कंत्राटी कामगारांच्या पाठीशी भाजपा ठामपणे उभा राहिला असुन या प्रश्नाची उकल होण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांच्यासह भाजपा शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन या बाबतीत लक्ष घालावे, अशी मागणी केली.भाजपा शिष्टमंडळाने यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आदर्शवत असुन अनेक केंद्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु प्रशासकीय कारभार सुरु झाल्यापासून त्यांच्या पगाराच्या बाबतीत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणून जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालून सदर कामगारांच्या पगाराचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे ताबडतोब पाठविण्याबाबत मुख्याधिकारी यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने केली. तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून काम करत असलेले प्रांताधिकारी यांचीही सावंतवाडी येथे जाऊन भेट घेतली व लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली.कंत्राटी कामगार कमी झाल्याने कायम असलेल्या कामगारांवर कामाचा ताण आलेला आहे. तसेच नगरपरिषद कार्यालयातील प्रशासकीय कामे सांभाळणारे अधिकारी/कर्मचारी यांचा अर्धा दिवस कचरा गोळा करणाऱ्या कामावर लक्ष देण्यासाठी जात असल्यामुळे कार्यालयात दुपारी १२ ते १२.३० वा.पर्यंत शुकशुकाट असतो.परिणामी विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो व कामही होत नाही. त्यामुळे आगामी काळात प्रलंबित कामांचा डोंगर नगरपालिकेत तर कचऱ्याचा डोंगर शहरात दिसणार आहे.प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच विकास कामांवर झालेला परिणाम याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे निदर्शनास आणले आहे. तसेच लवकरच वेंगुर्ले भाजपाचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कंत्राटी सफाई कामगारांना न्याय देणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..