चौके /-
मालवण तालुक्यातील धामापूर गावामध्ये सोमवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी रात्रौ उशिरा धामापूर थवीवाडी येथ श्री. उल्हास विनायक थवी यांच्या मालकीची ७५००/- रुपये किंमतीची नविन सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तर त्याच रात्री श्री. दिनेश ठाकूर आणि डॉ. वाळवे या दोघांच्या घरासमोरील दुचाकी स्वीच काढून डायरेक्ट करून चोरून नेण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न निष्फळ ठरल्याने दोन्ही दुचाकी दोघांच्याही घरापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिल्या.
सदरची बाब दुसऱ्या दिवशी तिघांच्याही लक्षात येताच शोधाशोध केली असता दुचाकी आढळून आल्या परंतु सायकल आढळून न आल्याने ती चोरांना नेल्याची श्री थवी यांची खात्री झाली. या चोरी प्रकरणाची माहिती पोलीस पाटील तसेच दूरध्वनी वरून कट्टा पोलिस दुरक्षेत्रातील पोलीसांना श्री उल्हास थवी, दिनेश ठाकूर आणि डॉ. वाळवे यांनी दिली आहे. चोरीच्या या प्रकारामुळे धामापूर गावामध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या अज्ञात चोरांना पोलीसांनी लवकरच पकडावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.