You are currently viewing “आपल्या बापाला काहीही होवू द्यायचे नाही” सदावर्तेंच्या अटकेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना मेसेज व्हायरल..

“आपल्या बापाला काहीही होवू द्यायचे नाही” सदावर्तेंच्या अटकेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना मेसेज व्हायरल..

मुंबई /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हल्ला झाल्यानंतर काल दुपारनंतर आणि शनिवारी रात्रभर या हल्ल्याचे राजकीय पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत.या घडामोडी दरम्यान हा हल्ला करण्यासाठी माथी भडकवल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकिल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना काल रात्री १० च्या सुमारास अटक करण्यात आली आहे. कोणतीही नोटीस न देता घरातून उचलून नेले असा त्यांचा आरोप आहे.

त्यानंतर हल्ल्यात सहभागी झाल्याबद्दल इतर १०२ आंदोलक एस. टी. कर्मचाऱ्यांनाही मध्यरात्री १२ वाजून ३० मिनीटांनी अटक करण्यात आली आहे. गावदेवी पोलिसांनी या सर्वांवर कलम 142,143,145,147,149, 332, 353, 333, 448, 452, 107, 120 (ब), भा.द.वी. r/w क्रिमिनल अमेंडमेन्ट कलम 7, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम 37 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या सर्वांना आज ११ वाजता न्याायालयात हजर करण्यात आले आहे.

मात्र त्यापूर्वी “आपल्या बापाला काहीही होवू द्यायचे नाही, कोणीही मुंबई सोडू नये” अशा सदावर्तेंना पाठिंबा देणाऱ्या आशयाचे मेसेज एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात येत आहेत. याशिवाय यात “आपल्याला न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. सोबतच आपल्या साहेबांवर (सदावर्ते यांच्यावर) लागलेली कलम नॉर्मल आहेत. ते सुखरुप बाहेर येतील पण अडचणीत साथ सोडणारे लक्षात राहतील. आज साहेबांना आपली गरज आहे, हे समजून घ्या” अशाही मेसेजसचा समावेश आहे.त्याचवेळी दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर पोलिसांनी आक्रमक होत आंदोलन मोडून काढण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे. त्यानंतर या आंदोलकांनी थेट सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठतं ठिय्या दिला आहे. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा