You are currently viewing हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाची उत्साहात सांगता!मठाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाची उत्साहात सांगता!मठाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मसुरे /-

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जयघोष आणि “स्वामी समर्थ नामाच्या” नामघोषात हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा भाविकांच्या अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा व मठाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा निमित्ताने ३  व ४ एप्रिल रोजी  विविध  धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रविवारी पादुका पूजन, अभिषेक होम-हवन, सत्यनारायण महापूजा, दुपारी पालखी मिरवणूक आणि महाआरती, दुपारी महाप्रसाद , निवडक गरजू महिलांसाठी कोकण कट्टा संस्था मुंबई व स्वामी समर्थ मठ यांच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. सायंकाळी श्री नवलाईदेवी ढोल पथक वाघोटन झलक यांचे सुस्वर भजन, श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडळ जोगेश्वरी यांचे सुस्वर भजन, श्री गांगेश्वर सेवा मंडळ निमतवाडी शिरगाव यांचे सुस्वर भजन, संदीप फडके वाडा नाडण यांचे स्वरयात्री प्रस्तुत भक्तिरंग कार्यक्रम झाला. रात्री आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा संदीप पुजारे नाडण-देवगड विरुद्ध बुवा समीर कदम पोखरण कुडाळ यांच्यामध्ये झाला. तर  सोमवार ४ एप्रिल रोजी सकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर सर्वांग स्नान आणि सहस्त्रधारा अभिषेक , सकाळी ८ ते १० रुद्राभिषेक आदी कार्यक्रम झाले. दोन दिवसात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वामींचे दर्शन घेतले. प्रकट दिनाच्या पूर्व संध्येला मठ ते शिरगाव पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड देवगड कार्यकारी गाव समिती, श्री स्वामी समर्थ कार्यकारी सभासद मुंबई सदस्य, तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व विश्वस्त ज्ञानेश्वर राऊत आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..