वेंगुर्ला –       नारळ बोर्ड व कॉयर बोर्ड यांनी दोघांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. नारळ शेतीसाठी सिंधुदुर्गात मोठा वाव असून कमर्शियलदृष्ट्या उत्पादनाचा विचार करणे आवश्यक आहे.चांगले नारळ उत्पादन झाल्यास चांगल्या प्रतीचा काथ्या उपलब्ध होऊ शकेल, असे प्रतिपादन कृषिभूषण तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम. के.गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले
नारळ विकास मंडळ कोची (राज्य केंद्र ठाणे), महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्था वेंगुर्ले आणि भारत ऍग्रो सर्व्हिसेस कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला काथ्या संस्था येथे नारळ उत्पादकता कशी वाढवावी, याबाबत मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.के.गावडे बोलत होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा लोकनेते ऍड.दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. पूजा कर्पे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने
झाले.यावेळी व्यासपीठावर कृषीभूषण एम. के. गावडे, काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त शात्रज्ञ डॉ.दिलीप नागवेकर,कॉयर बोर्डाचे रिजनल मॅनेजर श्रीनिवास बिटलिंगू, क्वायर बोर्डचे हर्षवर्धन, उद्योजक उमेश येरम,वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विजय देसाई,कॉयर बोर्डाचे राजेंद्र, भारत ऍग्रोचे चेअरमन भोसले, नारळ उत्पादक शेतकरी समिर खानोलकर, कॉयर बोर्डाचे अधिकारी देविदास, साखरे तसेच महिला काथ्या संस्थेच्या चेअरमन माधवी गावडे,
नारळ बोर्डाचे रुपेश तांबडे,धर्माजी बागकर, सावित्रीबाई फुले संस्थेच्या चेअरमन प्रविणा खानोलकर, सनराईज कॉयर  क्लस्टरच्या श्रुती रेडकर, मालवण पेंडूर क्लस्टरच्या अश्विनी पाटील, सुरंगी महिला संस्थेच्या सुजाता देसाई आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना श्रीनिवासन म्हणाले की, कोकणातील पाचही जिल्ह्यात काथ्या उद्योग वाढीसाठी कॉयर बोर्ड तत्पर आहे.काथ्या प्रशिक्षण,काथ्या उद्योग मार्गदर्शन कॉयर बोर्डच्या माध्यमातून सातत्याने दिले जाते. पंतप्रधान रोजगार योजनेतून उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची जबाबदारी क्वायर बोर्ड घेत आहे, असे ते म्हणाले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ.दिलीप नागवेकर बोलताना म्हणाले की, नारळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळाचे उत्पादन कसे वाढवता येईल या दृष्टीने नारळाच्या जाती, नारळाच्या दोन झाडांमधील अंतर, खते व पाणी व्यवस्थापन, नारळाच्या बागेमध्ये आंतरपिक लागवड,पीक संरक्षण ही पंचसूत्री अमलात आणणे आवश्यक आहे.नारळाच्या जातींची योग्य निवड करणे, दोन झाडांमधील अंतर वीस ते पंचवीस फूट असणे आवश्यक आहे. नारळ लागवडीपासून वाढीसाठी सावली,ऊन व सूर्यप्रकाश ही फार मोठी गरज आहे.रासायनिक खताबरोबर शेणखत, कंपोस्ट खत तसेच आवश्यक तेवढेच पाणी देणे गरजेचे आहे. नारळाच्या बागेमध्ये विक्रीयोग्य अशी भाजीपाला, अननस, केळी वगैरे आंतरपिके घेणे आवश्यक आहे.तसेच नारळमित्र प्रशिक्षण घेऊन काम केल्यास रोजगार उपलब्ध होऊ शकेल,असेही ते म्हणाले. यावेळी उदघाटक डॉ. पूजा कर्पे बोलताना म्हणाल्या की, वेंगुर्ले काथ्या संस्था चांगले कार्य करीत असून वेंगुर्लेचे भूषण आहे. महिला औद्योगिक संस्थेच्या तसेच प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रज्ञा परब यांनी प्रत्येक घराच्या चुली प्रज्वलित केल्या आहेत. नारळ हा कल्पवृक्ष आहे.त्यामुळे या प्रकारची प्रशिक्षणे देत संस्था नावारुपास आली आहे. नारळ लागवडीबरोबरच कौशल्यपूर्ण प्रशिक्षणे,उत्पादन वाढीबाबत माहिती,मार्गदर्शन घेऊन  व्यवसायास पूरक जोड द्यावे व  उद्योजक बनावे,असे त्या म्हणाल्या.कॉयर बोर्डचे हर्षवर्धन यांनी काथ्यावर आधारित उद्योग याबाबत मार्गदर्शन केले.पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत शासनाकडून मिळणाऱ्या कर्ज व अनुदान बाबत माहिती दिली.आंतरराष्ट्रीय लेव्हलला काथ्याच्या उत्पादनाला मोठी मागणी आहे.काथ्या उद्योगधंद्यासाठी मोठा वाव असून देवगड हापूस आंब्याप्रमाणे काथ्यालाही मागणी येणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र  येण्याची गरज आहे.शासनाच्या वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये आपले उत्पादन त्याठिकाणी पोहचविणे आवश्यक आहे,असेही ते म्हणाले.यावेळी डॉ. विजय देसाई यांनी नारळावरील कीड  व रोग व्यवस्थापन याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. उद्योजक उमेश येरम यांनीही नारळ लागवडीबाबत मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत प्रज्ञा परब यांनी एम.के. गावडे यांनी आभार मानले.यावेळी नारळ उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page