वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली गवळीवाडी जंगलमय भागात रात्रौ चालणाऱ्या जुगारावर वेंगुर्ले पोलिसांनी छापा टाकून, जुगाराच्या साहित्यासह ४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी संबंधितांविरोधात वेंगुर्ले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वेंगुर्ले पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलिस कॉन्स्टेबल परशुराम सावंत,पोलिस कॉन्स्टेबल अमर कांडर,पोलिस कॉन्स्टेबल राहुल बर्गे व महिला पोलिस रुपाली वेंगुर्लेकर या पोलिस पथकाने आडेली गवळीवाडा येथे रात्रौ छापा टाकला.
यावेळी सिकंदर अबु बक्करशा (बाहेरचावाडा सावंतवाडी),यशवंत भिकाजी यादव (वेंगुर्ले सुंदरभाटले),दिपक वसंत जुवलेकर(उभादांडा सुखटनवाडी),बबन तुळसकर(उभादांडा) विलास साटेलकर(सातारडा) आदी ५ जण मेणबत्तीच्या उजेडात जुगार खेळत असल्याचे आढळून आले.यामधील ५ जणांपैकी २ जण पळून गेले.याबाबत संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली असून संबंधिताविरोधात वेंगुर्ले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वेंगुर्ले पोलिस करीत आहेत.वेंगुर्ले पोलिसांमार्फत गेल्या काही दिवसात धडक मोहिम राबविण्यात येत असून जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.वेंगुर्ले पोलिसांच्या धडक कारवाईबाबत कौतुक करण्यात येत आहे.