कुडाळ /-

“संवेदनशील होण्यासाठी मातृभाषे शिवाय पर्याय नाही. मातृभाषेचे व्याकरण ज्याचे चांगले त्याला कोणतीही भाषा शिकणे कठीण नाही”. असे उद्गार शंकर प्रभू यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रमातर्फे घेण्यात आलेल्या मराठी राजभाषा गौरव दिन या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये मराठी ही नितांत सुंदर भाषा असल्याचे सांगत मराठी तील सुंदर कविता, गीतं सुस्वर गाऊन दाखविली ,भाषिक संस्कारी हे आचरणातून दिसतात. मराठी भाषाही उत्तम भाषा आहे. तिचे संस्कार पचवीत मराठी भाषकांनी आचरण केले पाहिजे .”माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट” हे नुसतं म्हणून न सोडता प्रत्यक्षात तिचा व्यवहारात पदोपदी वापर करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. असे सांगत कुसुमाग्रजांची” वेडात मराठे वीर दौडले सात” ही कविता वीरश्रीयुक्त आवाजात गाऊन सादर केली ;तर’ श्रावणबाळ’ कविता तेवढ्याच शोकात्म रसाचा परिपोष असलेल्या पद्धतीने सादर केली व उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी व्यासपीठावर प्रा अरुण मर्गज, प्रा कल्पना भंडारी ,प्रा परेश धावडे,डॉ. सुरज शुक्ला उपस्थित होते. उपस्थित अतिथींच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मराठी राजभाषा गौरव दिन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. अरुण मर्गज यांनी “भाषेशिवाय विचार नाही आणि विचारांशिवाय भाषा नाही.” याची जाणीव ठेवून भाषा विकासासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले. तसेच महान व्यक्तींनी कथन केलेली मराठीची थोरवी प्रतिपादन केली.त्यांच्या कवितांचा,गीतांचा, उक्तीचा, दाखला देत मराठीचे नितांत सुंदर रूप उपस्थितांसमोर कथन केले . यावेळी बॅ. नर्सिंग महाविद्यालय, फिजिओथेरपी महाविद्यालय, महिला महाविद्यालय, रात्र महाविद्यालय,ज्युनियर कॉलेज व बी.एड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगाचे जोशपूर्ण वातावरणात सादरीकरण केले. तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेली वारकरी परंपरा प्रसंगानुरूप वैशिष्ट्यपूर्ण अशा वेशभूषेत ,साभिनय नृत्याविष्कारात सादर केली .तर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘माणसाने माणसाशी माणसा सम वागणे” ही प्रार्थना व ‘श्यामची आई’च्या पुस्तकातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे नाट्य रूपांतर सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली तळकटकर ,चैतन्य शेळके यांनी केले, तर गौतमी मेस्त्री हिने उपस्थितांचे आभार मानले.अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या मराठी राजभाषा गौरव दिन सोहळ्यात विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page