मुंबई /-

मुंबईला मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसाने झोडपलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयं, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याबाबत मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी ‘लोकसंवाद लाईव्ह ला बातमी दिली आहे.

‘कालपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. आतापर्यंत 250 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढचे 24 तास अजून पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईत आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्वांनी घरी राहावं, असं आवाहन आयुक्त इक्बाल चहल यांनी केलं आहे.’काल आणि आज दिवसभर पाऊस झाला. काल रात्री 9 पासून आमचं काम सुरु आहे. 254 वॉटरपंप सुरु आहेत. पाणी उपसा करण्याचं काम सुरु आहे. अत्यावश्यक कर्मचारी सोडून कोणीही रस्त्यावर येऊ नये. जिथे पाणी तुंबते तिथे मी स्वत: पोहोचून आढावा घेत आहे’, अशी माहिती त्यांनी दिली
‘काल रात्री दहाच्या सुमारास दक्षिण मुंबई कुलाबा ते माहीम येथे 80 ते 250 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सांताक्रुझमध्ये 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. चेंबूर ते वाशीमध्ये तितका पाऊस झालेला नाही. सर्वाधिक पाऊस कुलाबा, दक्षिण मुंबईत पाऊस झाला आहे. जे अत्यावश्यक सेवेतील स्टाफ आहेत, आम्ही सर्व रस्त्यावर आहोत’, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई पुन्हा तुंबली…..

मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह ठिकठिकाणी गुडघ्याएवढं पाणी साचलं आहे. तसेच सांताक्रुझ, अंधेरी यासह पश्चिम उपनगरात घरांमध्ये पाणी शिरले आहे.मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक चाकरमानी हे अडकून पडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page