वैभववाडी /-
आरामबसमधून प्रवास करत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असलेल्या आरामबसचा चालक बाबू फकिरा नदाफ (रा. बोर्डवे) याला शनिवारी येथील दिवाणी न्यायालयाच्या न्या. डी. के. पाटील यांनी १५ हजाराचा सशर्थ जामीन मंजूर केला. तपासात सहकार्य करणे व महिन्यातून दोनवेळा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. संशयितातर्फे ऍड. उमेश सावंत व ऍड. भूषण बिसूरे यांनी काम पाहिले.
सदरची घटना ६ जानेवारीला रात्री १० वा. सुमारास घडली होती. पिडीत महिला आरामबसमधून गोवा ते ठाणे असा प्रवास करत होती. बस चेकनाक्यावर तपासणीसाठी थांबली असता महिला खाली उतरली. त्यावेळी तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे चालकाने वर्तन केले . याबाबत महिलेने ठाणे शहर गाठून तेथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र, घटना वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तपास वैभववाडी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला होता.