You are currently viewing औषधनिर्माण अधिकारी पद रिक्त असल्याने वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी सोमवारपासून राहणार बंद..

औषधनिर्माण अधिकारी पद रिक्त असल्याने वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी सोमवारपासून राहणार बंद..

वेंगुर्ला /-

शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथील औषधनिर्माण अधिकारी श्री. दिनेश राणे यांची प्रशासकीय बदली वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे झालेली आहे, मात्र त्यांना अद्याप पर्यंत कार्यमुक्त केलेले नाही. तरी त्यांना त्यांच्या पदावर तात्काळ रुजू करावेत अन्यथा सोमवार पासून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची सेवा बंद होणार असल्याचे पत्र अधिपरिचारिकांनी आरोग्य सहसंचालकांना लेखी स्वरूपात दिले आहे.

ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे औषधनिर्माण अधिकारी हे पद रिक्त असल्याने अधिपरिचारीकां जवळ औषधनिर्माण अधिकारी यांचा कार्यभार दिलेला आहे. त्यामुळे रुग्णपत्रक काढणे, औषध वितरीत करणे ही काम अधिपरिचारीकांना करावी लागतात पण ती त्यांच्या कर्तव्यामध्ये येत नाही. अधिपरिचारीका यांना त्यांच्या नेमून दिलेल्या रुग्णसेवेसंबंधीच्या कामाव्यतिरिक्त कोणतेही काम सोपविण्यात येऊ नये अशा शासनाच्या स्पष्ट सुचना आहेत. मात्र केवळ रुग्णालयीन कामकाजाच्या सोयीकरीता व माणूसकीच्या हेतूने आतापर्यंत अधिपरिचारीका हे कामकाज सांभाळत होत्या, परंतू औषध वितरण वरून आलेल्या बातम्यानुसार सदर पदावर कार्यभार सांभाळणाऱ्या अधिपरिचारीकांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागत आहे. मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही परिचारीका सदरचा कार्यभार सांभाळण्यास तयार नाही.
तरी शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथील श्री. दिनेश राणे औषधनिर्माण अधिकारी यांची प्रशासकीय बदली झालेली असून अद्याप पर्यंत त्यांना कार्यमुक्त केलेले नाही. तरी त्यांना वेंगुर्ले येथील पदावर तात्काळ रुजू करावेत अन्यथा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचे रुग्णपत्रक काढणे व औषध वितरीत करणे इत्यादी कामे तात्काळ बंद पडून रुग्णालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे. याला वेंगुर्ले येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल मुळे यांनी दुजोरा दिला असून त्यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग व आरोग्य सहसंचालक कोल्हापूर यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्याच्याकडे केलेली आहे. तसेच वृत्तपत्राच्या माध्यमातून जयराम राऊळ यांनी या रुग्णालयात कायमस्वरूपी औषधनिर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) हवा ही केलेली मागणी रास्त आहे, असेही डॉ. मुळे यांनी सांगितले.
दरम्यान अधिपरीचारिका यांच्या आंदोलनामुळे वेंगुर्ले रुग्णालयाची गैरसोय होणार आहे. तरी या संबंधीत जिल्हा शल्यचिकित्सक काय निर्णय घेतात त्यावरच रुग्णसेवा बंद होणार की नाही ते ठरणार आहे.

अभिप्राय द्या..