You are currently viewing एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून संपाबाबत निर्णय घ्या.;जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कणकवलीत आ.वैभव नाईक यांची घेतली भेट..

एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून संपाबाबत निर्णय घ्या.;जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कणकवलीत आ.वैभव नाईक यांची घेतली भेट..


कणकवली/

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कुडाळ मालवणचे आम. वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेतली. यावेळी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्याच्या मागणी बाबत चर्चा झाली. आमदार वैभव नाईक यांनी एसटीची वस्तुस्थिती माहीत करून दिली.यामुळे जनतेचे हाल होत आहेत हे सांगितले. जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून राज्य सरकारने त्यांच्या पगारात वाढ केली आहे. मात्र कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने अनेक एसटी कर्मचारी रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून संप मागे घेण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना केले. यावर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील संपाबाबत सर्वानुमते निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कर्मचाऱ्यांची पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा घडवून आणली. पालकमंत्री व खासदार यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत नेमलेली समिती जी काही शिफारस करेल, ती राज्य सरकार मान्य करेल, कर्मचाऱ्यांच्या इतर ज्या काही मागण्या असतील त्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी बोलून सोडविल्या जातील त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे ना. उदय सामंत, खा. विनायक राऊत यांनी सांगितले. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही एसटी कर्मचाऱ्यांनी दिली.

यावेळी एसटी कर्मचारी रोशन तेंडोलकर, राम वाडकर, अनिल कदम, गणेश शिरकर, प्रमोद धुरी, राजेंद्र धुरी, भास्कर घुरसाळे, अनिल पवार, राजेंद्र कांबळी, नाथ गोसावी, अरविंद म्हसकर, अनंत रावले आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..