You are currently viewing भास्कर जाधव यांचा प्रश्न स्वतःची वाळू चोरी वाचवण्यासाठीच.;माजी खा.निलेश राणे

भास्कर जाधव यांचा प्रश्न स्वतःची वाळू चोरी वाचवण्यासाठीच.;माजी खा.निलेश राणे

रत्नागिरी /-

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आज सभागृहात विचारलेला वाळूसंदर्भातील प्रश्न स्वतःचे वाळूचे धंदे वाचवण्यासाठीच केला, असा घणाघाती आरोप माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला.

महाराष्ट्र विधिमंडळात आज राज्यातील वाळू तस्करीचा प्रश्न आणि चिपळूणच्या वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचा विषय चर्चिला गेला. सभागृहात वाळू तस्करीचा मुद्दा ऐन रंगात आलेला असतानाच भास्कर जाधव यांनी नव्या विषयाला तोंड फोडले. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत गाळाचे मोठ्या प्रमाणात संचयन झाले आहे. तो गाळ विना रॉयल्टी काढण्यास सरकार अनुमती देणार आहे काय, असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला होता. त्याचा निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला.

भास्कर जाधव यांचा मूळ धंदा वाळूचा आहे. वाळूचे ठेके घेणे आणि वाळू पळवणे हाच उद्योग ते करतात. त्यांच्या व्यवसायांची आम्हाला माहिती आहे. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत गाळ साचला आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि तो काढला गेलाच पाहिजे. पण गाळ काढण्याच्या निमित्ताने वाळूचोरी करणारी मंडळी शिरकाव करतील. गाळ आहे तिथेच राहील आणि वाळू पळवून नेतील. भास्कर जाधव पालकमंत्री असताना आम्ही याच विषयावर त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते, त्यामुळे आम्हाला त्यांचे धंदे माहिती आहेत.

सभागृहात चुकीचा प्रश्न विचारून, आपण सर्वांची दिशाभूल केली आहे. तुम्ही कुणालाही मूर्ख बनवू शकता, आम्हाला नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी तुमचा हेतू आम्हाला माहिती आहे. तुम्ही जेव्हा काही अनधिकृत करायला जाल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की थांबवू, असे निलेश राणे म्हणाले.

अभिप्राय द्या..