आचरा /-
उंडील तालुका देवगड भागात बिबट्यांची दहशत पसरली असून. रविवारी सायंकाळी चारायला सोडलेल्या गुरांवर हल्ला करत दोन गाईंचा फडशा पाडला तर एका गाईला जखमी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.एकाच वेळी दोन जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने बिबट्या ची संख्या एका पेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे.दरम्याने या कालावधीतच वाघिवरे भागातही बिबट्या ने जनावर मारल्याने बिबट्याचा वाढता स्वैराचार धोकादायक ठरत असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
रविवारी सायंकाळी उंडील येथील ब्राम्हणदेव मंदिर लगतच्या रानात आपली गुरे चारावयास गेलेल्या लवू नर,सोनू नर , सुधाकर नर यांना जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून बघण्यासाठी गेले असता लवू महादेव नर यांच्या दुभत्या गाईचा ,सोनू ब्रम्हा नर यांच्या गाभन गाईंचा फडशा पाडलेला दिसला तर सुधाकर नर यांच्या गाईला बिबट्याने जखमी केलेले दिसून आले.या बाबतची माहिती मिळताच उंडील सरपंच जयेश नर , पोलीस पाटील जयवंती नर यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली.या बाबत वनविभागाला कल्पना दिल्यावर देवगड वनपाल विलास मुळे यांनी उंडील गावात भेट देऊन माहिती घेतली.दरम्याने वाघिवरे धनगर वाडा येथील संजय कोकरे यांच्या एका पाड्याचा बिबट्याने फडशा पाडला आहे तर एका ला जखमी केल्याने या भागात बिबट्यांची चांगलीच दहशत पसरली आहे.त्यामुळे बिबट्यांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी उंडील सरपंच जयेश नर पोलीस पाटील जयवंती नर यांच्या कडून करण्यात येत आहे.