“सी-वर्ल्ड” प्रकल्पात जीव गुंतल्याची खासदार राऊत यांनी केली टिका.

कणकवली /-

हिम्मत असेल तर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी नाणार रिफायनरी प्रकल्प रेटून दाखवावा, असे प्रति आव्हान खासदार विनायक राऊत यांनी राणेंना दिले आहे. “सी-वर्ल्ड” प्रकल्पाच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या जमिनीत राणेंचा जीव गुंतला आहे. त्या ठिकाणी त्यांना आपल्या नातेवाईकांच्या नावावर हॉटेल उभे करायचे आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री.राऊत बोलत होते.

श्री. राऊत म्हणाले, राणेंचा जीव सी वर्ल्डमध्ये गुंतलेला आहे. ३०० एकर मध्ये सी वर्ल्ड करायचा आणि १४०० एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेल उभी करायची, हा धंदा राणे यांचा होता. त्यापासून ते दूर गेलेले नाहीत. हा त्यांचा प्रयत्न चालूच राहणार आहे,तसेच कोणत्याही परिस्थितीत वायंगणी, तोंडवळी गाव उध्वस्त करून सी वर्ल्ड होणार नाही. नाणार रिफायनरी बाबत राणे यांनी जनाची नाही तर मनाची काहीतरी लाज वाटली पाहिजे. नाणार रिफायनरी होता कामा नये म्हणून संपूर्ण देवगड मधून गाड्याच्या गाड्या भरून मोर्चे काढले होते. त्यावेळी भाजप सरकारवर टीका देखील केली होती, असेही राऊत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले केंद्रीय मंत्री राणे यांनी काल पत्रकार परिषदेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर शिवसेनेचा कलेक्शन करणारा मंत्री म्हणून आरोप केला होता. यावर आज विनायक राऊत यांनी थेट राणेंवर टीका केली आहे. राणे यांना अशा सगळ्या शब्दांची चांगली ओळख आहे. मंत्री पदाचा वापर करून कलेक्शन कसं करायचं आणि त्रास देऊन त्यांना कसं लुबाडायचं हा अनुभव नारायण राणे यांच्या पाठिशी मोठा असल्यामुळे स्वतःच्या अनुभवावरुन अनिल परब यांची तुलना करत आहेत. दोन दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत महागाई भता वाढ करण्याची जबरदस्त ऐतिहासिक निर्णय अनिल परब यांनी घेतलाय. त्यामुळे हा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणारा आहे. अशा पद्धतीचा निर्णय नारायण राणे यांच्या कारकिर्दीत घेतला नाही त्यामुळे त्यांची ती पोटदुखी आहे, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page