मसुरे /-

मानवता विकास परिषद ही एक संस्था नसून देशव्यापी चळवळ आहे. आपला सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर याची सुरुवात आपण आपल्या गावातून सर्वप्रथम केली पाहिजे. समर्थ भारत घडविण्यासाठी आज काळाची पावले ओळखून आपण तन मन धन अर्पून काम केले पाहिजे तरच समर्थ भारत घडू शकणार आहे. या देशव्यापी चळवळीत आज आपण सर्वांनी सहभाग घेऊन मानवता विकास परिषदेच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी येथे केले.
मानवता विकास परिषद आणि मातृत्व आधार फाउंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमानाने चला समृद्ध सामर्थ्यवान भारत घडवूया या मोहिमेचा शुभारंभ मालवण वायरी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी मालवण सागरी महामार्ग ते एसटी स्टँड, भरड नाका, पिंपळपार ते वायरी अशी एक रिक्षा आणि मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅली मधून मानवता विकास परिषदची उद्दिष्टे व मानवता विकास परिषदेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या चळवळी विषयी प्रबोधन करण्यात आले.वायरी येथे चला समृद्ध सामर्थ्यवान भारत घडवूया या मोहिमेचा शुभारंभ श्रीकांत सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा नारायण शांताराम गोसावी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब गोसावी म्हणाले, आज आपण सर्वांनी स्वतः पुढाकार घेऊन कोणत्याही राजकारण्यांच्या मागे न लागता जर विकासात्मक विचारांसाठी एकत्र होऊन लढा दिल्यास खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही. जेव्हा जेव्हा मानवता विकास परिषद आणि त्यांचे सर्व सहकारी एखाद्या विधायक कामासाठी आवाज देतील त्यावेळी नारायण शांताराम गोसावी चॅरीटेबल ट्रस्ट तुम्हा सर्वांच्या मागे खंबीरपणे उभी राहील. यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगले काम करणारे मालवणचे सुपुत्र बाबू ढोले यांचा रोख रुपये दोन हजार आणि शाल श्रीफळ देऊन बाळा गोसावी यांनी गौरव केला. यावेळी बोलताना मातृत्व फाऊंडेशनचे संतोष लुडबे म्हणाले, आज समाजामध्ये विविध स्तरावर रंजल्या-गांजल्या यांची सेवा मातृत्व आधार फाउंडेशन आणि येथील रिक्षा बांधव हे अगदी तळमळीने करत आहेत. येथील सर्व रिक्षा बांधवांचे कार्य आज समाजाभिमुख आहे. परंतु अशा सर्व तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आज आपण सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. यावेळी कोरोना कालावधीमध्ये आणि समाजाभिमुख काम करणाऱ्या मालवण मधील रिक्षा चालकांचा विशेष गौरव करण्यात आला. विविध मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आप्पा चव्हाण, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, मातृत्व आधार फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष लुडबे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पप्पू कद्रेकर, दादा वेंगुरलेकर, प्रभुदास आजगावकर,सामजिक कार्यकर्ते बाबू ढोले, ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, राजा मांजरेकर, सिध्देश वराडकर, सुरेश बापार्डेकर, पंकज मसूरकर, मधुकर जाधव, प्रसाद पराडकर, संतोष नागवेकर, विठू वराडकर, नीलेश लुड्बे,दिलावर शेख, जॉनी मेंडीस, सचिन कदम, नितीन आंबेरकर, कदाफी शेख, गजानन गावकर, चंद्रशेखर मेस्त्री, संदेश पाताडे, वैभव माणगावकर, संतोष हिवाळेकर, रामा मसुरकर झूबेर खान आदी उपस्थित होते. मातृत्व फाउंडेशन मालवण वायरी च्या वतीने सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल म्हणून समाजसेवक बाळासाहेब गोसावी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.सूत्रसंचालन, प्रास्ताविक दत्तप्रसाद पेडणेकर आणि आभार ऐश्वर्य मांजरेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page