मालवण/-

पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या तारकर्ली गावात जाणारा वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे रुंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरण करावे अन्यथा जनआंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

तारकर्ली रस्त्याबाबत २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधून रस्त्याच्या रुंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरण व्हावे यासाठी मागणी केली होती. त्यानंतर या कामासाठी निधी मंजूर झाल्यावर गेल्या तीन वर्षात रस्त्याबाबत कोणतेही काम झालेले नाही. यामुळे रस्त्याची दुर्दशा होऊन त्याचा त्रास वाहनचालक व पादचाऱ्यांना होत आहे. पर्यटन हंगामात पर्यटकांच्या गाड्यांनी गजबजलेला हा रस्ता खराब झाला आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम केले. मात्र खड्डे एकीकडे आणि डांबर एकीकडे अशी या कामाची गत आहे.

यापूर्वी राज्यपालांच्या दौऱ्यावेळी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर पर्यंत डांबरीकरण पर्यटनाच्या निधीतून करण्यात आले. यापुढेही या रस्त्याचे काम होण्यासाठी कोणा वरिष्ठ पुढाऱ्यांना बोलवावे लागणार का असा सवाल सुरेश बापर्डेकर यांनी उपस्थित केला आहे. तारकर्ली पर्यटन गाव असल्याने या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण व हॉटमिक्स डांबरीकरण व्हावे अन्यथा जनआंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असे बापर्डेकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page