सिंधुदुर्ग /-
हत्तींचा सहवास असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील जंगलात भेडले माड लावण्यात आल्याने त्याचा फायदा झाल्याचा दावा सावंतवाडीचे,उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी केला आहे. हत्तींचे खाद्य जंगलात उपलब्ध करुन दिल्याने नुकसिनीचा आकडा ६० टक्क्यांनी कमी झाला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी हत्तींना हटविण्यासाठी राबविण्यात आलेले फटाके फोडणे, ढोल वाजविणे आदी प्रकार चूकीचे होते. त्यामुळे उलट हत्ती बिथरुन हल्ला करीत होते, असे नारनवर यांनी म्हटले आहे. आता हा प्रकार बंद करण्यात आला असून संबंधितांना नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी आमचा कल असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शहाजी नारनवर यांच्या संकल्पनेतून जंगलात राहणारे प्राणी वस्तीत उतरु नयेत यासाठी खास उपाययोजना आणि उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पर्यावरण दिन तसेच वनसप्ताहाचे औचित्य साधून जंगलात वन्य प्राण्यांना आवडणारी झाडे लावण्यात आली होती. त्यात प्रकर्षाने मोठ्या प्रमाणात भेडले माड लावण्यात आले होते. त्यामुळे आता त्या ठिकाणी खाद्य मिळत असल्यामुळे हत्ती वस्तीत येत नाहीत, असा त्यांचा दावा आहे. तर दुसरीकडे हत्ती वस्तीत घुसल्यास कोणी त्यांना हुसकावू नये. त्यांच्याकडून जी नुकसानी होईल, ती भरपाई वनविभाग देण्यास तयार आहे, असेही नारनवर यांनी सांगितले आहे.