सिंधुदुर्ग /-
शिक्षक भारतीचे सलग नऊ दिवस जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण अखेर संघटनेच्या बहुतांश मागण्या जिल्हाधिकारी यांनी मान्य केल्याने तसेच त्यांच्या सुचनेनुसार माध्य. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी लेखी पत्र दिल्याने अखेर थांबवण्यात आले आहे.
जिल्हा अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी गणेश चतुर्थी हा कोकणातील महत्त्वाचा सण असल्याने चतुर्थीपर्यंत कोरोना ड्युटीसाठी शिक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.तसेच १०वी १२वीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ड्युटीतुन वगळण्याची मान्य केली.याशिवाय कोवीड ड्युटी केल्यानंतर कार्यमुक्ती प्रमाणपत्र देण्याच्याही मागणीही मान्य केली.ड्युटी करत असताना अथवा त्यानंतर १५दिवसात जर एखादा शिक्षक कर्मचारी कोविड पाॅजिटिव्ह निघाला तर त्याला विशेष रजा मंजूर करण्यासंदर्भात सीईओ व ईओ यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी याप्रसंगी आश्वासन दिले.
विशेष म्हणजे कोराना काळात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या योगदानाबद्दल जिल्ह्यातील सर्व शिक्षकवर्गाला जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी विशेष धन्यवाद आहेत.
जिल्हा अधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर,राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण, जिल्हा पदाधिकारी दत्तात्रय मारकड,श्री. तडवी आदी सहभागी झाले होते.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी पाठविलेले प्रतिनिधी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्री. मंद्रूपकर यांनी उपोषण कर्त्यांना लिंबू सरबत देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली याचवेळी मान्य मागण्याचे लेखी पत्र दिल्याने अखेर उपोषण थांबविण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर ,दत्तात्रय मारकड
विद्यानंद पिळणकर ,देवगड तालुका अध्यक्ष हेमंत सावंत आदी आज नवव्या दिवसी उपोषणाला बसले होते.
तर जिल्हा सचिव-सुरेश चौकेकर,राज्य प्रतिनिधी सी.डी. चव्हाण, शिवाजी बरकडे,नरहरी डावरे,राजन खोचरे,नितीन गावकर,महादेव मोटे, रामदास भिसे,किरसिंग पाडवी जिल्हा पतपेढी चेअरमन संदीप कदम, उपाध्यक्ष अनंत सावंत आदींनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
मंगळवारी उपोषणाचा नववा दिवस होता.
…अशा होत्या संघटनेच्या मागण्या..-
समन्यायी साखळी पध्दतीने कोविड ड्युट्यांचे नियोजन व्हावे-
माध्यमिक शाळेतील शिक्षकांने आत्तापर्यंत प्रशासनाला सहकार्य केले आहे त्यामुळे यापुढे त्यांना ड्यूटी लागूच नये ही आमची भूमिका आहे. तरीही जर अत्यावश्यक म्हणून ड्युटी लावावी लागणार असेल तर समन्यायी साखळी पध्दतीने कोविड ड्युट्यांचे नियोजन करण्यात यावे, ठराविक शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी.
फ्रंन्ट लाईन वर्करचा दर्जा मिळावा-
तसेच कोविड ड्युटी करणाऱ्या शिक्षकाला फ्रंन्ट लाईन वर्करचा दर्जा मिळावा, याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विमा कवच देण्यात यावे, एखादा शिक्षक कोविड बाधित झाल्यास त्याला विशेष रजा मंजूर व्हावी.
वयोवृद्ध व दुर्धर आजाराने त्रस्त शिक्षकांना ड्युटीतुन वगळावे-
कोवीड ड्युटी संपल्यावर कामगिरीवर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला कार्यमुक्ती प्रमाणपत्र देण्यात यावे.
55 वर्षांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार कोविड ड्युटीवर काढू नये.तसेच दुर्धर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना व गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना ड्यूटीतून वगळावे यासह अन्य मागण्यांबाबत उपोषण सुरू आहे.
भर पाऊसातील उपोषणाचा नववा दिवस…
सोमवार दि.२३आॅगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते, मंगळवारी ३१रोजी नवव्या दिवशी ही उपोषणकर्ते भर पावसात बसून उपोषण करताना दिसत होते. अशीच काहीशी परिस्थिती दरदिवशी होती.
प्रथमच शिक्षकांचे सलग नऊ दिवसाचे उपोषण!
शाळेतील कर्मचारी आंदोलनमध्ये आपल्या न्याय्य हक्कासाठी आणि विशेष म्हणजे शाळा सुरू करावी म्हणून सलग नऊ दिवसाचे साखळी उपोषण शिक्षकांना करावे लागले. , हे शिक्षकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.अशी जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी खंत व्यक्त केली.