उपसभापती सिद्धेश परब यांनी शिरोडा ग्रा.पं.ची बदनामी करण्यापेक्षा गावासाठी विकासनिधी आणावा.;मनोज उगवेकर

उपसभापती सिद्धेश परब यांनी शिरोडा ग्रा.पं.ची बदनामी करण्यापेक्षा गावासाठी विकासनिधी आणावा.;मनोज उगवेकर

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले पं. स. उपसभापती सिद्धेश परब यांनी उठसुठ शिरोडा ग्रामपंचायतीची बदनामी करण्यापेक्षा शिरोडा गावातील विकासकामांसाठी आपल्या माध्यमातून विकास निधी आणून गावाच्या विकासास हातभार लावावा,असे शिरोडा ग्रा.पं. सरपंच मनोज उगवेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि,वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब यांच्या कडून आतापर्यंत वेंगुर्ले तालुक्यातील इतर गावे सोडाच, परंतु स्वतःच्या मतदार संघात ही कोणत्याच प्रकारची महत्वाची विकासकामे न केल्याने निवडून दिलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झालेला आहे.१२ ऑगस्ट रोजी झालेल्या वेंगुर्ले पंचायत समितीच्या ऑनलाइन मासिक सभेत या वेळी तरी सिद्धेश परब हे आपल्या गावासाठी काहीतरी चांगले उपक्रम राबविण्याविषयी किंवा विकासकामांविषयी सकारात्मक चर्चा करतील, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आजपर्यंत जी नाविन्यपूर्ण विकास कामे होत आहेत त्या बद्दलचा अभिनंदनाचा ठराव ते मांडतील असे अपेक्षित होते.परंतु यावेळीही असे काहीच न घडता केवळ राजकीय द्वेष भावनेतून प्रेरित होऊन शिरोडा सरपंच व ग्रामसेवक जाणून बुजून ग्रामस्थांचा छळ करत असल्याचा आरोप करून शिरोडा ग्रामपंचायतीची बदनामी करत आहेत.वास्तविक स्वतः च्या मतदार संघातील ग्रामपंचायतीवर आरोप करण्यापूर्वी सिद्धेश परब यांनी हक्काने व अधिकाराने या विषयीची पूर्ण माहिती घेऊन पुढाकाराने या विषयावर सामंजस्याने तोडगा काढणे आवश्यक होते.शिरोडा रहिवासी निरंजन मठकर यांनी गेल्या वर्षी जी अनधिकृत इमारत बांधली होती त्यावर हरकत असल्याने व त्यांना अनधिकृत घर नंबर देण्यासाठी ज्या महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता होती त्याची त्यांनी ११ ऑगस्ट २०२१ रोजी काही प्रमाणात पूर्तता केल्याने शिरोडा ग्रामपंचायतीच्या१२ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता झालेल्या मासिक सभेमध्ये सरपंच , उपसरपंच,वार्ड सदस्य व इतर सर्व ग्रा पं सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार निरंजन मठकर यांना अनधिकृत घर नंबर दिलेला आहे.त्यामुळे १२ ऑगस्ट रोजीच आपण १५ ऑगस्ट रोजीचे उपोषण मागे घेत असल्याच्या निवेदनाची प्रत मठकर यांनी ग्रामपंचायतला सादर केलेली आहे.सदर घर नंबर देताना गेले काही दिवस वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन सुरू होते.गावातील कोणत्याही ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी शिरोडा ग्रामपंचायत घेत आहे.
त्यामुळे शिरोडा ग्रामपंचायतीला अडचणीत आणण्याच्या संधी शोधण्यात आपली कारकीर्द घालविण्यापेक्षा सिद्धेश परब यांनी शासनामार्फत जी विकासकामे मंजूर होऊनही निधीअभावी रखडलेली आहेत त्याचा पाठपुरावा करावा. तसेच गावातील इतर लोकप्रतिनिधींप्रमाणे गावच्या विकासास हातभार लावावा,असे शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

अभिप्राय द्या..