सिंधुदुर्गनगरी /-

दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील 32.25 हेक्टर आर क्षेत्रावरील खाणपट्ट्यामध्ये 29 जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियन 2005 नुसार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी खाणपट्ट्यातील खाणकाम व खनिजाची वाहतूक पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश मे.मिनरल्स ॲँड मेटल्स यांना सोमवारी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 30 मधील पोट कलम 3 व 5 अन्वये, हे आदेश देतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी खाण सुरक्षा निर्देशालय, प्रादेशिक कार्यालय, गोवा यांच्या निर्देशानुसार आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याबाबत ही आदेशीत केले आहे. मे मिनरल्स ॲँड मेटल्स करिता संचालक संदीप श्रीवास्तव व व्यवस्थापक माईन्स मॅनेजर, कळणे माईन यांना पाठविलेल्या या आदेशात म्हटले आहे, 29 जुलै रोजी सकाळी 8 ते 8.30 वा. दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील प्रमुख खनिज खाण पट्ट्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊन 20 ते 25 कुटुंबांच्या घरामध्ये पाणी गेले. तसेच शेतीचे व बागायतीचे नुकसान झाले आहे. मंजूर असलेल्या खाणपट्ट्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या डोंगराचा काही भाग व बेंचेस पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये पडले. त्यामुळे खड्ड्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर फेकले गेले. या खड्ड्यास असलेला बांध फुटून पाणी दुसऱ्या खडड्यामध्ये आले. पाण्याच्या अतिरिक्त दबावामुळे खाणीच्या दक्षिणेकडील बांध फुटला व त्यातील माती मिश्रीत पाणी मोठ्या प्रमाणात गावाच्या दिशेने प्रवाहित झाले. हे पाणी गावातील स्थानिकांच्या घरामध्ये, शेतामध्ये व बागायतींमध्ये शिरले. पाण्याचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे यात घरांचे, शेतीचे, बागायतींचे व प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. १४ घरे, गोठयांचे नुकसान सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांनी सादर केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार एकूण 14 घरे, गोठे यांचे एकूण 14 लाख रुपये आणि भात शेती, नागली बागायती अंदाजे 30 हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page