सिंधुदुर्ग /-

मालवण शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत प्रचंड गोंधळ उडत असल्याने यातून वादाचे प्रसंग उद्भवत असून जनतेतून याचा रोष लोकप्रतिनिधींवर येत आहे. त्यामुळे मालवणात शहरातील लसीकरणाचे योग्य नियोजन करावे तसेच ग्रामीण भागापेक्षा मालवण शहराला दिवसाकाठी किमान ५०० डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजी त नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेऊन मालवणातील लसीकरणविषयक समस्यांबाबत लक्ष वेधत निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्यासमवेत मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर आदी उपस्थित होते. मालवण शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. यासाठी मालवण नगरपरिषदेच्या मामा वरेरकर नाटयगृह येथे लसीकरणासाठी सोय केली आहे. तरी पण सध्या त्या ठिकाणी ऑफलाईन नोंदणीमुळे प्रचंड गोंधळ उडत आहे. लसीकरणासाठी लोक आदल्या दिवशी पासून रांगा लावून राहत आहेत. त्यामुळे नंतर सकाळच्या सत्रात वादाचे प्रसंग उद्भवतात. यात आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्याचा त्रास होतो. आणि पर्यायाने याचा रोष लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आमदार, पालकमंत्री, नगराध्यक्ष व नगरसवेक यांच्यावर येत आहे, त्यामुळे याबाबत तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी निवेदनात म्हटले आहे. मालवण शहरात काही लोकांची दुसऱ्या डोसची मुदत संपूनही बरेच दिवस झाल्याने त्यांना लसीकरण करता आलेले नाही. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने अपंग, वृध्द याबाबत लसीकरण डोसचे स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागापेक्षा मालवण शहरी भागाला किमान ५०० डोस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ऑफ लाईन मध्ये गोधळ निर्माण होत असल्याने ऑनलाईनच रजिस्टेशन करण्याबाबत विचार व्हावा. या सर्व उपायांबाबत विचार करून योग्य ते नियोजन करावे, अशी मागणीही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page