खारेपाटण /-

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ठतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या “केस स्टडीज चे” संकलन नुकतेच करण्यात आले असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून एकमेव अशा कणकवली तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. शाळेच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल केंद्र शाळा खारेपाटण नं. १ चे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण या गावात डोंगर माथ्यावर निसर्गाच्या कुशीत असलेल्या या शाळेला नुकताच गतवर्षी “राज्यस्तरीय सर्वांग सुंदर आदर्श शाळा” हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या बरोबरच राज्यस्तरीय मॉडेल स्कुल म्हणून देखील महाराष्ट्र शासनाने या शाळेची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड केली असून “राज्यस्तरीय आदर्श शाळा” हा बहुमान देखील शाळेला प्राप्त झाला आहे. शाळेच्या या दैदिप्यमान कामगिरीमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून नुकतीच या शाळेची राज्यातील सृजनशील शाळा मध्ये “केस स्टडीज” करीता राज्यस्तरावर निवड झाली आहे. शाळेच्या या यशा बद्दल जि. प. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. गौरी शिंदे, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, उपाध्यक्ष आण्णा तेली, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष समीक्षा शेट्ये, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ऋषिकेश जाधव यांनी शाळेचे आणि शाळेच्या आमूलाग्र बदलामध्ये आणि जडणघडणीत ज्यांचा मोलाचा व सिंहाचा वाटा आहे असे कृतीशील व परिवर्तनवादी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा, अनुदानित शाळा, शासकीय आश्रमशाळा, विद्यानिकेतन वा सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळा तसेच वेगळा मार्ग यशस्वीपणे स्वीकारणाऱ्या व सकारात्मक, शाश्वत बदल घडवून आणलेल्या शाळांकडून “केस स्टडीज” मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक एकूण ७२ शाळा तर इंग्रजी माध्यमाच्या एकूण ३ शाळा अशा एकूण राज्यातील सर्वोत्कृष्ट ७५ शाळांची केस स्टडीज साठी निवड करण्यात आली असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण केंद्र शाळा नं.१ या एकमेव प्राथमिक शाळेचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. “केस स्टडीज” साठी निवड करण्यात आलेल्या या शाळांचा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन (मिपा) औरंगाबाद या संस्थेच्या संचालिका डॉ. नेहा बेलसरे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

खारेपाटण केंद्र शाळेच्या “केस स्टडीज” चा समावेश (मिपा), औरंगाबाद या संस्थेच्या वतीने राज्यस्तरावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या “फ्लिप बुक” मध्ये करण्यात आल्याचे जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page