वेंगुर्ले /-
तालुक्यातील तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचायत समिती वेंगुर्ला सभापती सौ अनुश्री कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रातिनिधिक स्वरूपात तेथिल लोकप्रतिनिधींच्या उपस्थित त्या त्या ठिकाणी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना सभापती सौ.कांबळी यांनी सांगितले की सध्या वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने माझ कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान हाती घेतले आहे. १५ सप्टेंबर ते १० आँक्टोबर हा या अभियानाचा पहिला टप्पा असून १२ आँक्टोबर ते २४ आँक्टोबर हा दुसरा टप्पा आहे. घरोघरी सर्व्हे करून अजून बाहेर न पडलेले रुग्ण शोधून त्यांना उपचारापर्यंत आणण्याशिवाय पर्याय नाही. शासनाने आणि विशेष करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेला हा कार्यक्रम असून मंगळवारपासून घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. आज अनेक व्यक्तींना लक्षणे दिसून येताहेत मात्र असे लोक घाबरून उपचार घेण्यास पुढे येत नाहीत. जे आरोग्यदूत म्हणून सर्व्हे करणार आहेत,त्यांनी न घाबरता काम करावे.
यापुर्वी कोरोना कालावधीत तालुक्यात आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचारी,पोलिस तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर विभागांचे शासकीय कर्मचारी आणि विशेषतः नागरिक आजी माजी लोकप्रतिनिधी विविध स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले आहे.त्यामुळे आपण सारेच कोरोना योद्धे आहात असे सांगत त्याबाबत सभापतींनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य यशवंत परब,तुळस सरपंच शंकर घारे, तालुका आरोग्य अधिकारी सौ अश्विनी माईणकर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जुन्नरे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.