कुडाळ /-
कोरोनाच्या कालावधीत शब्दशः मेलेल्याच्याही टाळूवरील लोणी खाण्याचा धंदा सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी चालवला आहे. संकटकाळात राजकारण नको याचा अर्थ “मिलबाट के खाओ” असा आहे का? सिंधुदुर्गनगरीत कोविड हॉस्पिटलमधील मृतदेह जाळण्याच्या ठेक्यातून साधण्यात आलेल्या अर्थकारणाची होत असलेली चर्चा ही जिल्ह्यासाठी लांछनास्पद आहे. जनतेत चर्चिले जाणारे माणुसकीहीन प्रकार घृणा आणणारे आहेत. सदरचा ठेकेदार हा सत्ताधारी राजकीय पक्षाचा बडा पदाधिकारी असल्याने या प्रकाराला आशीर्वाद कोणाचा याची चर्चा होत आहे. सत्तेच्या दबावाखाली न येता प्रशासनाने तातडीने सत्यशोधक समिती स्थापन करून शासकीय अधिकाऱ्यांसह त्यात निःपक्ष सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करावा. सत्य उघडकीला येईपर्यंत कोणत्याही स्थितीत त्या ठेकेदाराचे बिल पास करू नये. जिल्हा प्रशासनाने तसे केल्यास पुढील न्यायालयीन कारवाईत जिल्हा प्रशासनाला देखील पार्टी करण्यात येईल असा रोखठोक इशारा भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की सिंधुदुर्गनगरीत मृतदेह जाळण्याच्या कामात झालेल्या चर्चित गैरप्रकारांची चौकशी होणे गरजेचे असून चौकशी होईस्तोवर सदर ठेकेदाराचे बिल कोणत्याही परिस्थितीत अदा करू नये. कथित प्रकार हा जिल्ह्याची प्रतिमा डागाळणारा असून अत्यंत दुर्दैवी आहे. या निवेदनानंतर जर चौकशी समिती नेमून अहवाल येण्याची वाट न पाहता सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली आपणाकडून सदर ठेकेदाराला बिल अदा केले गेल्यास आपल्या खात्याला या गैरव्यवहारात पुढील न्यायालयीन कारवाईत पक्ष बनवण्यालाही पाठीपुढे पाहणार नाही.
सिंधुदुर्ग नगरीत कोरोना मृतांचे मृतदेह जाळण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या गैरप्रकारची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. सरकारी तिजोरीतुन सदर ठेकेदाराला प्राधिकरणाद्वारे सुरुवातीच्या काळात १५ हजार व सध्या १० हजार मृतदेह जाळण्यासाठी दिले जात असल्याचे समजते. रुग्णालयातून प्रेत जाळण्याच्या ठिकाणी रुग्णवाहीकेतून नेऊन प्रेत जाळण्याकरिता लाकडांकरता लागणारे पैसे दिले जात होते. आपणाद्वारे नेमलेल्या ठेकेदाराला प्रशासनाने कोरोना आजारात मृत्यू पावलेल्या रुग्णालयातील रुग्णांचे मृतदेह मोफत जाळण्याचे काम दिले होते. त्याचे पैसे शासन अदा करत आहे याची कल्पना सदर ठेकेदाराने पेशंटच्या नातेवाईकांना न देता सामाजिक सेवेचा कांगावा करत अंत्यसंस्कार व अन्य विधीसाठी दहा ते पंधरा हजारपर्यंत रूपयांची मागणी करून सदर पैसे उकळलेले आहेत. सदर घृणास्पद प्रकाराची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रतिमा डागाळली आहे. सदर ठेकेदाराने एकाच सरणावर दोन ते तीन प्रेते रचून कमी लाकडात दहन करणे, आहे, तसेच अर्धवट जळलेल्या प्रेतांवर पेट्रोल डिझेल टाकून ती जाळली जाणे, प्रत्येक प्रेताच्या अस्थी देण्याच्या नवखा नातेवाईकांकडून पैसे उकळून लोकांच्या भावनांचा खेळ केला जाणे अशा गैरप्रकाराची जोरदार चर्चा आहे. अनेक राजकीय पक्षांकडे जनतेच्या तक्रारी येत आहेत. सदर प्रकरणात सत्यता असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याने या अत्यंत लांच्छनास्पद प्रकाराची तातडीने योग्य समिती नेमून चौकशी करायला हवी. सदर समितीद्वारे तिथे दहन झालेल्या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांकडे चौकशी करत सत्य माहितीचा अहवाल घेणे गरजेचा आहे. सदर चौकशी योग्य व निष्पक्षपणे होणे गरजेचे आहे कारण सदर ठेकेदार हा सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असून सत्ताधारी राजकीय आशिर्वादाखाली सदर प्रकार दडपला जायची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आज आपणाकडून कोणत्याही दबावाखाली न येता ठेकेदाराचे बिल रोखण्यात यावे. तसेच आरोग्य तक्रार निवारण समिती अध्यक्ष म्हणून सदर बिलाबाबत चौकशी करण्यात यावी. आपणास आपणास विनंती आहे या गंभीर प्रकारचा अहवाल तातडीने घ्यावा आणि चौकशीअंती ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच या नातेवाईकांकडून घेतलेले पैसे त्यांना शासनाकडून थेट परत केले जावेत, अशीही मागणी भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांनी केली आहे.