वैभववाडी /-
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती तत्काळ उठवा, तसेच मराठा समाजाला नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन वैभववाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार वैभववाडी यांना देण्यात आले.
यावेळी तहसील कार्यालय परिसरात एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. अशी घोषणाबाजी मराठा बांधवांनी करून परिसर दणाणून सोडला. हा निर्णय मराठा समाजावर अन्याय करणारा आहे. या निर्णयामुळे समाज बांधव नोकरी व शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.राज्यात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. अशी मागणी गेली अनेक वर्षे सुरू आहे.त्यानंतर मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रात भव्य असे मूक मोर्चे काढून शासनाला जाग आणली.
त्यानंतर शिवसेना – भाजप युती सरकारने मराठा समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर न्यायालयीन लढाई सुरू झाली. उच्च न्यायालयातील सुनावणीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहचली. सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे.भविष्यात मराठा समाजातील तरुण- तरुणींनाचे नोकरी व शैक्षणिक सवलतींसाठी मोठे नुकसान होणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नाकडे पुढील काळात नियोजनबद्ध लक्ष देणे गरजेचे आहे. न्यायालयात शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडावी व सुधारित अध्यादेश काढावा असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते वेळी जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे, महेश रावराणे, सज्जनकाका रावराणे, रोहन रावराणे, पप्पू इंदुलकर, प्रकाश पाटील, विजय रावराणे, सचिन तावडे, सुनील रावराणे, रत्नाकर कदम, रवींद्र रावराणे ,मनोज सावंत,किशोर दळवी,सुरज तावडे व मोठ्या संख्येने तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित होते.