वैभववाडी/-


कोविड रुग्णालयाची परवानगी नसताना शासनाकडून ऑक्सिजन सिलेंडरची उचल करून फसवणूक केल्या प्रकरणी कुडाळ येथील गुरुकृपा नर्सिंग होमचे मालक डॉ. गुरुप्रसाद अनंत सौंदत्ती यांच्या वर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक किशोर मुनिराज रांजणे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मेडिकल ऑक्सिजनला जीवनावश्यक औषधांचा दर्जा देण्यात आला आहे. कोविड १९ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होण्याच्या दृष्टीने शासनाने ऑक्सिजनचा प्रभावी वापर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
कुडाळ येथील गुरुकृपा नर्सिंग होम यांच्याकडे कोविड १९ रुग्णालय चालविण्याचा कोणताही परवाना नाही. असे असता त्यांनी कोविड रुग्णालय चालवीत असल्याचे भासवून शासनाने जिल्ह्यासाठी पुरविलेल्या ऑक्सिजन सिलेंडर ची शासनाकडे मागणी केली. त्यांनी कोविड रुग्णालय चालवीत असून मेडिकल ऑक्सिजनची अत्यंत तातडीची आवश्यकता असल्याचे भासविले होते.
त्यानी केलेल्या मागणीनुसार कोल्हापूर ऑक्सिजन अँड असिटीलीन प्रा.ली. कोल्हापूर यांच्याकडून १० ऑक्सिजन सिलेंडर ची उचल केली.
दरम्यान, करूळ येथे तपासणीसाठी गेलेल्या तहसीलदार रामदास झळके यांनी हे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणारी गाडी ( MH 07 P2852) तपासली असता ही बाब निदर्शनास आली.
दरम्यान, गुरुकृपा नर्सिंग होम यांच्याकडे कोविड रुग्णालय चालविण्याचा परवाना नसताना शासन आदेशाचा भंग करून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कुडाळ येथील गुरुकृपा नर्सिंग होमचे मालक डॉ सौंदत्ती व गाडी चालक यांच्या विरोधात भा.द.वी. कलम ४२०,१८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम २६ व ३० सह वाचन कलम ५१ बी अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page