कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदय सामंत यांना,कुडाळ नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबत
निवेदन देत कामगारांच्या प्रश्नी लक्ष वेधले आहे.
कुडाळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर दिनांक १० ऑगस्ट २०१५ रोजी झाले असुन नगरपंचायत स्थापनेच्या वेळी कुडाळ ग्रामपंचायतीकडे ६० कर्मचारी होते.कुडाळ नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये कुडाळ नगरपंचायतीच्या ६० कर्मचाऱ्यापैकी फक्त १३ कर्मचारी यांचे समावेश झालेले आहे. तसेच ६० कर्मचान्यापैकी ११ कर्मचारी हे सेवानिवृत्त व मयत झालेले असून त्यांना कोणत्याही प्रकारचा शासनाचा लाभ मिळालेले नाहीत.त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.उर्वरीत ३६ कर्मचारी यांचे अद्याप समावेशन न झाल्याने त्यांना तुटपुंज्या पगारावर उदरनिर्वाह करावा लागत असून त्यांच्या सेवेवर टांगती तलवार आहे.सदर कर्मचाऱ्यांमध्ये १७ कर्मचारी हे सफाई कर्मचारी असुन उर्वरीत नळपाणी योजनेवरील व वाहन चालक या अत्यावश्यक सेवेतील आहे.
यापूर्वी मी स्वतः सर्व नगरपंचायत कर्मचाऱ्यांसोबत आपली भेटही घेतलेली होती व आपण त्यावेळी या संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपल्या समवेत चर्चा घडवून योग्य तो न्याय दिला जाईल असा शब्द दिलेला होता. तरी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने कुडाळ नगरपंचायत कर्मचारी वर्गाला आपण न्याय मिळवून द्यावा अशी नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.