वेंगुर्ला / –
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या दैनिक डेली मार्केटमध्ये वेंगुर्ले शहरातील व ग्रामीण भागातून स्वत:चा व कुटुंबाचा उदर निवार्ह चालविण्यासाठी विविध स्वरूपाचा किरकोळ माल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या महिला – पुरूष व्यापाऱ्यांना वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मार्केटमध्ये व्यापारासाठी जागा मिळत नसल्याने या किरकोळ व्यापारी विक्रेत्यांना मुख्यरस्त्याच्या कडेला बसून माल विक्री करावी लागते. अशा विक्रेत्यांकडून नगरपरिषद कर वसुल करते. परंतु नगरपरिषदेकडून कोणत्याही स्वरूपाची सुविधा पुरविली जात नाही. असे दिसून येते. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या किरकोळ विक्रेत्यांना माल विक्रीसाठी जागा देण्यांत यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांना दिलेल्या लेखी निवेदनात, वेंगुर्ले नगरपरिषदेच्या दैनिक मार्केटमध्ये पूर्वीपासून नियमांनुसार किरकोळ माल विक्रेत्यांना सकाळी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार जागा उपलब्ध करून देण्यांत येत होती. सध्या मात्र या बाजारपेठेत अवास्तव जागा अडवून काही व्यापारी व्यापार करताना दिसून येत आहेत. यामुळे किरकोळ विक्रेते वा व्यापाऱ्यांना बाजारपेठेत त्यांच्या किरकोळ व्यापारासाठी जागा उपलब्ध होत नाही. म्हणून आपली रोजीरोटी कमविण्यासाठी किरकोळ व्यापार करणाऱ्या महिला व पुरूष व्यापारी मंडळी मुख्य रस्त्याच्या कडेला बसून आपला व्यापार करतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे काही प्रमाणांत वाहतुक कोंडीचे प्रकार वारंवार घडतात व याची सर्वानाच त्रास सहन करावा लागतो.
तरी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या सर्व किरकोळ व्यापाऱ्यांना नगरपरीषदेच्या दैनिक (डेली) मार्केटमध्ये नगरपरिषदेच्या नियमांनुसार जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, महिला प्रदेश सरचिटणीस नम्रता कुबल, जिल्हा सदस्य नितीन कुबल,शहर उपाध्यक्ष वामन कांबळे, राष्ट्रवादी सोशल मिडीया सेलचे अध्यक्ष सुहास मांजरेकर यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.