वेंगुर्ले नगरपरिषद येथे ‘सफर वेंगुर्ल्याची‘ वेबसाईटचे उदघाटन संपन्न..
वेंगुर्ला /-
कोकणातील माणूस भात, मासे आणि दुपारची झोप मिळाली की, खूश असतो. पण सातत्याने नवनवीन संकल्पना राबवून आपल्या उद्योग-व्यवसायात वाढ व्हावी, आपल्या आजूबाजूचा परिसर प्रकाश झोतात यावा यासाठीच्या जाहिरात क्षेत्रात तो अगदीच कमी पडतो.जाहिरात हे आजच्या युगाचे प्रभावी माध्यम आहे. येथील पर्यटनाच्या जाहिरातीसाठी सोशल मिडियाचा करण्यात आलेला वापर निश्चितच पर्यटनाला चालना देणारा आहे,असे मत उद्योजक तथा किरात ट्रस्टचे विश्वस्त रघुवीर उर्फ भाई मंत्री यांनी ‘सफर वेंगुर्ल्याची‘ या चित्रफितीच्या शुभारंभ प्रसंगी वेंगुर्ले येथे केले.वेंगुर्ला नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वेंगुर्ला नगरपरिषद व किरात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटनावर आधारीत ‘सफर वेंगुर्ल्याची‘ या मालिकेतील पहिल्या भागाचे तसेच नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा‘ या ध्वनिफितीचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,चित्रकार सुनिल नांदोस्कर, किरात ट्रस्टचे खजिनदार सुनिल मराठे,सचिव सीमा मराठे,नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे आदी उपस्थित होते.वेंगुर्ला तालुका हा विविध निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. यामध्ये ऐतिहासिक व पुरातन वास्तू, मंदिर व खाद्य संस्कृती, सण-उत्सव यांच्यासह सांस्कृतिक कला-परंपरा यांचा समावेश आहे. हे सर्व ‘सफर वेंगुर्ल्याची‘ या चित्रफितीतून मांडण्याचा प्रयत्न वेंगुर्ला नगरपरिषद व किरात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने केला आहे.‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१‘ आणि ‘माझी वसुंधरा‘ अभियानांतर्गत नगरपरिषदेच्यावतीने पंचमहाभूतांचे महत्त्व सांगणा-या ध्वनीफितीचे अनावरण नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये पंचमहाभूतांनी बनलेली वसुंधरा सा-यांच्या गरजा पूर्ण करु शकते. पण एखाद्याचा हव्यास नाही. वसुंधरेचे भवितव्य आपणच वाचवूया. अशा आशयाचे आवाहन नागरिकांसाठी करण्यात आले आहे. ही ध्वनीफित नगरपरिषदेच्या घंटागाड्यांसह इतर गाड्यांवर दररोज प्रसारित केली जाणार आहे.या कार्यक्रमाला भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,नगरसेवक तथा विधाता सावंत,नगरसेविका श्रेया मयेकर,साक्षी पेडणेकर, कृतिका कुबल,शितल आंगचेकर,पुनम जाधव,स्नेहल खोबरेकर, कृपा मोंडकर, चित्रकार सुनिल नांदोस्कर, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, ‘माझा वेंगुर्ला‘चे राजन गावडे, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा मराठे यांनी तर सूत्रसंचालन व आभार नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.