धीरज परब मित्र मंडळाची अभिनव संकल्पना..
कुडाळ /-
धीरज परब मित्रमंडळ कुडाळ यांच्यामार्फत दर वर्षी अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्या प्रमाणेच यंदा हा वाचनालयाला स्पर्धापरीक्षांची पुस्तके भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबविला गेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. परंतु परिस्थितीनुरूप योग्य मार्गदर्शन व सुविधांची वानवा असल्याने त्यांना या क्षेत्रात वाटचाल करताना अडचणी येत असतात. अशा होतकरू विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, यासाठी कुडाळमधील रा. ब.अनंत शिवाजी देसाई वाचनालयाला पंचवीस हजार रुपयांची स्पर्धात्मक परीक्षांची पुस्तके भेट देऊन धीरज परब मित्र मंडळाने उपक्रम केला . ही सर्व पुस्तके ही नवीन अभ्यासक्रमानुसार निवडलेली आणि दर्जेदार आहेत. सकाळ प्रकाशन, युनिक अकॅडेमी, आर्यन प्रकाशन, के.सागर, ज्ञानदीप प्रकाशन अशा ख्यातनाम प्रकाशनाची, तसेच आर एस अग्रवाल, बाळासाहेब शिंदे, एकनाथ पाटील आदी नामवंत लेखकांची ही सर्व मौल्यवान, नामांकित पुस्तके आहेत. हि सर्व पुस्तके वाचनालयात अभ्यासकांना संदर्भासाठी मोफत उपलब्ध असणार आहेत.
सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचारातून व मार्गदर्शनामुळे आम्हाला ही प्रेरणा मिळाल्याचे श्री धीरज परब यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर वाचनालय संचालक श्री आनंद वैद्य सर, श्री. प्रसाद रेगे, मराठा समाजाचे नेतृत्व ऍड.सुहास सावंत, आप्पा भोगटे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, नितीन शिरसाट, ऍड आनंद गवंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री.अभिजित गोवेकर, श्री. विष्णू धुरी, श्री समीर नाईक, श्री.ऋषिकेश परब, श्री शशांक पिंगुळकर, श्री सिद्धांत बांदेकर, श्री चेतन राऊळ, श्री गौरव मोडक, श्री विनीत परब, श्री प्रथमेश धुरी, दयानंद ठाकूर, सुशांत परब, रमाकांत नाईक, सागर सावंत आदी धीरज परब यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित सर्वांनी या अभिनव उपक्रमाबद्दल धीरज परब यांचे कौतुक केले. श्री आनंद वैद्य सर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यशाची वाट सुलभ करणारा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत भावी पिढीच्या प्रगतीसाठी श्री धीरज परब यांच्या सामाजिक दृष्टिकोनाचा आदर्श सर्वांनी घेतल्यास जिल्ह्यातुन उद्याचे प्रशासकीय अधिकारी निर्माण होतील असा आशावाद व्यक्त केला. अनेकांनी अशा प्रकारे उपक्रम करावेत व भावी पिढीला योग्य मार्ग दाखवावा, असे आवाहन केले. धीरज परब मित्र मंडळ यांच्या संकल्पनेचे सर्वांनी स्वागत केले आहे.