वैभववाडी /-
महाविकास आघाडी सरकार आपण कोकणचा विकास केला आहे.अशा खोट्या वल्गना करत आहे.कोकणातील शेकडो धनगर वस्त्या आजही रस्ते,वीज,पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. येत्या अधिवेशनात राज्य सरकारला कोकणातील धनगर समाजाच्या प्रलंबित समस्यांबाबत जाब विचारून सरकारचे पितळ उघडे करणार आहे.त्यासाठी धनगर समाज बांधवानी संघटीत राहून आपल्या मागण्यासाठी सरकार विरोधी लढा देणे गरजेचे आहे,असे आवाहन आ.गोपीचंद पडळकर यांनी वैभववाडीतील धनगर समाज बांधवांना केले.वैभववाडी दत्त मंदीर येथे वैभववाडी तालुक्यातील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी शिवरदास बिडगर,धनगर समाज मराठवाडा नेते प्रशांत आखाडे, मंगेश गोरे, नवलराज काळे,आर .डी .बोडेकर, गंगाराम अडुळकर, गंगाराम शिंदे,नावळे सरपंच स्नेहा शेळके,सुर्यकांत बोडके, विजय कोकरे, प्रभाकर कोकरे,जेयश शेळके, ऍड विक्रमसिंह काळे व शेकडो वैभववाडी तालुक्यातील धनगर बांधव उपस्थित होते.
पुढे आ.पडळकर म्हणाले,कोकणातील जनतेला शिवसेना नेते भावनिक विधाने करून वापर करून घेत आहेत.प्रत्येक्षात कोकणचा विकास म्हणावा तसा झालेला नाही.रस्ता,कोकणात रस्ते, पाणी,वीज या समस्या गंभीर आहेत. काही दऱ्या खोऱ्यात तीन ते चार कि .मी .पाय वाटेने चालत जावे लागत आहे .अशा ठिकाणी राहणाऱ्या महिला,शाळकरी मुले 3 ते 4 की. मी.दररोज पायपीट करून जीवन जगत आहेत.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे हा मुद्दा ज्वलंत आहे.मात्र आघाडी सरकार धनगर समाजाकडे दुर्लक्ष करत आहे.देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला एस.टी. सर्टिफिकेट देऊन आदिवासीच्या प्रमाणे जशाच्या तशा 22 योजना धनगर समाजाला लागू केल्या.सन 2019 – 20 मध्ये 1 हजार कोटींचे बजेटमध्ये तरतूद केली.त्यापैकी 5 कोटी लेखशीर्षकाखाली घेतले होते ते खर्च झाले नाही.सण 2020 – 21 ला 8 हजार 853 कोटी आदिवासींच्या साठी तरतूद केली होती.गेल्या वर्षीचे 500 कोटी व या वर्षीच्या 3 हजार कोटी महाविकास आघाडी सरकारने बुडविले आहेत. कोकण,आदिवासी भाग,कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो वाड्या वस्त्या अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत.त्याच प्रमाणे किनार पट्टीलगतच्या मच्छिमारांच्या अनेक समस्या आहेत.महाराष्ट्र राज्यात देश स्वातंत्र्य झाल्यापासून लोकशाहीत ठराविक घराण्यांचे कल्याण झाले. काही प्रस्तापित घराणी महाराष्ट्र राज्याच्या मानगुटीवर बसली आहेत.वर्षांनुवर्षे घराणेशाहीची परंपरा घेऊन निवडणूका लढवुन निवडून आल्यावर सरकारने ठराविक पाहुण्यांच्या घरात पैसा नेण्याचे काम केले आहे.महाराष्ट्रात ठराविक सरदार काही घराण्यांनी यार केले आहेत.अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जनतेने बोलले पाहिजे अशी टीकाही त्यांनी केली.त्यानंतर वैभववाडी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी आपल्या मागण्याचे निवेदन दिले.